लोकमत आॅनलाईन धुळे : शहर व जिल्ह्यात सध्या सुरू झालेल्या वीज भार नियमनाविरोधात शिवसेनेसह सर्वांनीच आक्रमक पवित्रा घेतला. गुरूवारी सेनेसह समाजवादी पार्टी, भारिप बहुजन महासंघ यांच्यातर्फे वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, धीरज पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यकर्ते अधीक्षक अभियंता यांच्या सह्याद्री बिल्डींगवरील कार्यालयात धडकले. त्यांनी अभियंत्यांना घेराव घातला. तसेच मागण्यांचे निवेदन दिले.तर दुसरीकडे साक्रीरोडवरील कार्यकारी अभियंता कार्यालयात समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीज कार्यालयास कुलूप लावून अधिकारी, कर्मचाºयांना आत डांबले. जोरदार घोेषणांमुळे परिसर दणाणला. या आंदोलनात अकिल अन्सारी, जमील अन्सारी, नगरसेवक अमिन पटेल, इनाम सिद्दीकी, आलमगीर शेख, गोरख शर्मा, गुलाब कुरेशी, रशीद शाह आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. भारिप बहुजन महासंघातर्फेही शहर कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. शहरात मुस्लिम व दलित वस्ती परिसरांमध्येच भार नियमन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. भार नियमन त्वरित बंद करा, अन्यथा कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी भैय्या पारेराव, राज चव्हाण, योगेश जगताप, निलेश अहिरे, नाना महाले, गौतम बोरसे, अनिक शेख, भिला अहिरे, इम्रान शेख, रहीम पटेल आदी सहभागी झाले.