लोकमत आॅनलाईनधुळे : येथील महापालिकेची निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली होईल व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशा दोन मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी रविवारी झालेल्या बैठकीत एकमत झाले. आहे. परंतु या निर्णयात दगाफटका झाला तर सर्व मार्ग खुले आहेत. अर्थात सोमवारी रात्री पुन्हा बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय होईल, असे आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. यामुळे यासंदर्भात अनिश्चिततेचे वातावरण असून नामनिर्देशन पत्र भरण्याचा मंगळवारी अंतिम दिवस असल्याने पक्षाच्या येथील दोन्ही निवडणूक कार्यालयांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. मात्र सा-यांचे लक्ष मुंबईत आज रात्री होणा-या बैठकीकडे लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत डावलण्याच्या मुद्यासह पक्षातर्फे गुंडांना पक्षात प्रवेश व निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार असल्याच्या मुद्यावर आमदार अनिल गोटे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पािहल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. तसेच स्वत:ला महापौर पदाचे उमेदवारही जाहीर केले होते. राज्य विधानसभेचे अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. त्यासाठी आमदार गोटे शनिवारीच मुंबईला रवाना झाले होते. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार गोटे यांनी चर्चा केली. त्यात निवडणुकीचे नेतृत्व व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, या मुद्यांवर एकमत झाले. त्याबदल्यात आमदार गोटे यांनी राजीनामा देण्याचा आग्रह सोडून द्यावा, असे ठरले. मात्र दुस-या गटाकडून, ए.बी. फॉर्म आम्हीच वाटू , वेळ काढू अशा प्रकारच्या वल्गना होत आहे. त्यामुळे मी आजच पक्षनेतृत्वास स्पष्ट जाणीव करून दिली आहे की, मी प्रामाणिकपणे सर्व मान्य केले आहे. जर माझ्याशी दगाफटका कराल तर मला माझे सर्व मार्ग मोकळे आहेत. अर्थात आज रात्री पुन्हा बैठक होणार असून त्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे आमदार गोटे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.