धुळे: संघटनात्मक बांधणी करत असतानाच शिंदे गटासोबत युती झाली आहे. राज्याचा कारभार देखील सुरु झालेला आहे. विधानसभेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप आणि शिंदे गटाची युती कायम राहणार आहे. पूर्ण ताकदीनिशी आम्ही येणाऱ्या निवडणुकीत सहभाग घेऊ. जागा वाटपात आमच्या आणि त्यांच्या वाट्याला ज्या जागा जातील त्या सर्व जिंकून आणण्यासाठी प्रयत्न राहतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते धुळ्यात आले होते. त्यांनी पत्रकारांशी एका हॉटेलमध्ये संपर्क साधला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ. तुषार रंधे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, राज्य उपाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, विक्रांत पाटील, माधुरी बाफना, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यांशी संपर्क सुुरु केलेला आहे. त्यात धुळे हा तेरावा जिल्हा आहे. संघटनात्मक कार्यक्रमाची रचना करण्यात येत आहे. विस्तार करत असतानाच नाविन्यपुर्ण काय करता येईल याचा विचार होणार आहे. केंद्राच्या असो वा राज्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या जातील. पक्षातील कार्यकर्ते यांना बळ दिले जाणार आहे. शिंदे गटासोबत भाजपने युती केली असल्याने आगामी सर्व निवडणुकांमध्ये आमची युती राहील. जागा वाटपात त्यांच्या वाटेला ज्या जागा जातील त्यासह आमच्या जागा या पुर्ण ताकदीनिशी जिंकून आणल्या जातील. पालकमंत्र्यांची नेमणूक बाकी असून ते अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्याकडे लक्ष देऊ. सत्ता हातातून गेल्यामुळे महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी बावचळले असल्याने काहीही बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.