मालपूर : अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरणलोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरणारा, मागीलवर्षी तालुक्यातील पश्चिम भागाची तहान भागविणाऱ्या मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात यावर्षी अद्याप पाणीसाठा झालेला नाही. या प्रकल्पात मागीलवर्षीच्या साठ्यातील ४८ टक्के जलसाठाच शिल्लक असून यावर्षी प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होईल की नाही, याची चिंता भेडसावत आहे.मागीलवर्षी हा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होऊन दुसऱ्यांदा भरला. जलसाठा जास्त झाल्याने वेळोवेळी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी सोडावे लागले. मात्र, यावर्षी पावसाळा सुरू होऊन सुमारे दोन महिने पुर्ण होत आले तरी प्रकल्पात एक थेंब पाणी आले नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.मागीलवर्षी २२ जुलैैच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली तर देवदिवाळीपर्यंत या पावसाने उसंत घेतली नाही. संपूर्ण शेतशिवारात जिकडे पाहावे तिकडे पाणी दिसून येत होते. परिणामी रब्बी हंगाम देखील खुप मोठ्या क्षेत्रफळावर दिसून आला. उन्हाळ्यात जंगल हिरवेगार दृष्टीस पडत होते. यामुळे पावसाळ्यात पुन्हा जंगल हिरवेगार होऊन पशुधनाला मुबलक प्रमाणात चारा होण्यास वेळ लागणार नाही. अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा फोल ठरल्या असून १५ जूनपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे येथील रानावनातील चारा सुकून गेला असून पिके कोमेजून गेली आहेत. हा प्रकल्प भरल्यानंतर मालपूरसह परिसरातील सर्वच खेड्यांची तसेच नजीकच्या दोंडाईचा शहराची देखील तहान भागते. यामुळे हा प्रकल्प शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरणारा आहे. मात्र, १३ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर येथे मागीलवर्षी पाणी पहायला मिळाले.
अमरावती मध्यम प्रकल्पात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:34 PM