धुळे: साेलापूर येथील अडत व्यापाऱ्याने साक्री तालुक्यातील रुनमळी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला तब्बल २ लाख ३३ हजार ८९५ रुपयांत गंडविले. कांदा घेऊनही पैसे देण्यास फिरवा फिरव होत असल्याने फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्री तालुक्यातील रुनमळी येथील सचिन नरेंद्र पवार (वय ३२) यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. साक्री तालुक्यातील रुनमळी शिवारात सचिन पवार यांची शेती आहे. ५ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री त्यांच्याकडून कांद्याच्या ५५३ गाेण्या भरुन विक्रीसाठी नेण्यात आल्या. परंतु संबंधित दोघा अडत व्यापाऱ्यांनी कांदा विक्रीचा खर्च वजा करून पवार यांना २ लाख ३३ हजार ८९५ रुपये अदा करणे आवश्यक होते.
परंतु त्यांनी पवार यांना पैसे दिलेच नाहीत. पवार यांच्याकडून तगादा लावला जात असल्यामुळे उलट त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोलापूर येथील श्री सिध्देश्वर मार्केट यार्डमध्ये राजकुमार आणि नारायण (पूर्ण नाव आणि वय माहिती नाही) यांचे दुकान आहे. या ठिकाणाहून त्यांचा कांद्याचा व्यवसाय चालतो, अशी माहिती सचिन पवार यांनी निजामपूर पोलिसांना दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.