राजेंद्र शर्मा
धुळे : अवघ्या महिनाभराच्या थकीत पगारासाठी महापालिकेत येऊ gbन अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करणारा मनपा कर्मचारी संजय अग्रवाल याला महापौर प्रतिभा चौधरी त्यांनी झापले. आपली हयात महापालिकेत पालवत असताना व महिनाभराचा पगार कोणत्या कारणासाठी थकीत आहे, हे माहीत असतानाही संजय अग्रवाल यांनी आत्मदहनाचा ड्रामा का केला, असा सवाल करत महापौर प्रतिभा चौधरींनी अग्रवाल यांना सुनावले.
आयुक्त देविदास टेकाळे यांनीदेखील अग्रवाल याला सुनावले. काल निवेदन देता आणि २४ तासही उलटत नाही, तोच आत्मदहनाचा प्रयत्न करता, यातून केवळ महापालिकेची बदनामी होईल, असे आयुक्त म्हणाले.
विशेष म्हणजे आज थकीत पगाराची जोरदार मागणी करत संजय अग्रवाल व काही कर्मचारी महापालिकेत आले. त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.हा ड्रामा सुरू असताना पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून अनेक कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने काढता पाय केला. संजय अग्रवाल हे आयुक्तांच्या दालनात खुर्चीवर बसले. दोन पोलिस कर्मचारीही आत आले. ते संजय अग्रवाल यांची समजूत काढत असताना अग्रवाल यांनी अंगावर पेट्रोल ओतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. त्यानंतर अग्रवाल हे बाहेर पडले. अग्रवाल यांना चर्चेसाठी महापौरांच्या दालनात बोलावले. यावेळी कामगार नेते गणपत पवारदेखील उपस्थित होते. महापौर प्रतिभा चौधरी यांनी सुरुवातीला संजय अग्रवाल यांना त्यांच्या वर्तनाबद्दल झापले. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असे सांगितले. त्यानंतर मोठ्या बहिणीच्या भूमिकेतून संजय अग्रवाल यांची समजूत काढत त्यांच्या अशा कृतीमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असते. तुम्हाला कुणी भडकवले का? अशी विचारणाही महापौरांनी केली. अनुदान मिळाल्यानंतर लवकरच तुमच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा पगार केला जाईल, असे महापौर आणि आयुक्तांनी अग्रवाल यांना आश्वस्त केले.