सोनगीर : धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील प्राचीन श्री १००८ कुंथुनाथ दिगंबर जैन मंंदीर अतिशय क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.कुसुंबा येथील श्री १००८ कुंथुनाथ दिगंबर जैन मंदिरात नव्याने जैन धर्मातील २४ तीर्थंकर यापैकी २०वे तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ (नवग्रह अरिष्ट निवारक) यांची विलोभनीय अशी पाषाणाची मूर्ती विराजमान करण्यात आली.या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव प.पू. तपस्वी अंतर्मन प्रसन्नसागरजी मुनिश्री व प.पू.पियुषसागरजी मुनिश्री यांच्या सानिध्यात उत्साहात पार पडला.यावेळी मुनिश्री यांनी येथील प्राचीन जैन मंदिराचा इतिहास जाणून घेतला. तसेच जुने कुसुंबा गावातील प्राचीन दिगंबर जैन मंदिराच्या इतिहासाची देखील माहिती घेतली.या कार्यक्रमप्रसंगी प.पू. प्रसन्नसागरजी मुनिश्री यांनी प्राचीन श्री १००८ कुंथूनाथ दिगंबर जैन मंदिरास अतिशय क्षेत्र म्हणून घोषित केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित हजारो जैन श्रावकांनी टाळ्याचा गजरात अतिशय क्षेत्र जाहीर झाल्याचा आनंद व्यक्त केला.या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन श्रुतकुमार जैन यांनी केले. तर प्रतिष्ठाचार्य प्रदीप मधुर शास्री यांच्या मंत्रोच्चाराने पूजनपाठ व प्रतिष्ठा विधी पार पडला.नविन प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री मुनिसुव्रतनाथ भगवंताचा प्रथम अभिषेक करण्याचा मान चैतन्य वनचे चेतनकुमार जैन, डॉ.उर्जित जैन यांना मिळाला, अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख सतीश जैन यांनी दिली. या महोत्सवात भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रमासाठी पद्मावती युवा मंचने विशेष परिश्रम घेतले.
प्राचीन कुंथुनाथ दिगंबर जैन मंंदीर अतिशय क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:29 PM