दोंडाईचा : सर्वसामान्य, गरीब जनतेला अल्प दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने अर्धशतकापूर्वी दोंडाईचा येथे छोटेसेरुग्णालय सुरू करणारे शल्यचिकित्सक’ डॉ. रवींद्रनाथ रंगनाथ टोणगावकर (८१) यांचे सोमवारी कोरोनामुळे नाशिकला उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने खान्देशातील देवदूत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पत्नी डॉ. आशाताई, मुलगा डॉ. राजेश, सून डॉ. ज्योस्ना यांनी रुग्णसेवेचा वारसा सुरू ठेवला आहे. त्यांचा दुसरा मुलगा राहुल पुण्याला आय.टी. इंजिनीअर असून मुलगी राजश्री दंडवते पुण्यात आर्किटेक्ट आहे. हर्निया शस्त्रक्रियेची जाळी त्यांनी फक्त ५० पैशांत तयार केली होती. २२०० रुपयांचे हर्निया किट त्यांच्यामुळे अवघ्या ९५० रुपयांना मिळत आहे. वडील स्वातंत्र्यसेनानी रंगनाथ टोणगावकर व आई मुख्याध्यापिका मंदाकिनी यांचे संस्कार व आदर्श त्यांनी जीवनभर अंगीकारले. ते ‘नाना’ या नावाने परिचित होते.
बी. जे. मेडिकल कॉलेजला प्रवेशासाठी एक सडपातळ मुलगा टोपी, सदरा आणि पायजमा घालून आला. काही जण उपहासाने त्याला मामा म्हणाले. मात्र या ‘मामा’ने अभ्यासात सर्वांनाच मामा बनवित प्रत्येक टप्यातील प्रत्येक विषयात सुवर्णपदक मिळविले. हा विक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे.
अंनिसचे राज्य उपाध्यक्ष
डॉ़ टोणगावकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय उपाध्यक्ष होते. माझी आध्यात्मिक वाटचाल, दोंडाईच्याचा डॉक्टर (‘मेकिंग आॅफ अ रूरल सर्जन’ हे मूळ इंग्रजी आत्मवृत्त) आदी पुस्तके त्यांनी लिहिली.