लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा नदीपात्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना अडथळा ठरणारे ९२ वृक्ष तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपा वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली आहे़ तर शिवेसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी संबंधित अर्जावर हरकत घेतली आहे़ शहरातील पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून प्रत्येकी साडेपाच किमीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत़ या कामांना अडथळा ठरणारे ९२ वृक्ष तोडण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एजाज शाह यांनी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीला सादर केला आहे़ निंबाचे २५, पिंपळाचे ५ व इतर ६२ वृक्षांचा समावेश आहे़ नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्जावर हरकत घेतली आहे़ बांधकाम विभागाने फेब्रुवारी महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन वृक्षतोड करण्यासाठी निविदा काढली होती़ त्यानंतर लागलीच परदेशी यांनी हरकत घेतली आहे़ मनपा क्षेत्रात बांधकाम विभाग बेकायदेशिर वृक्षतोड करण्याच्या प्रयत्नात असून ती थांबविण्यात यावी, असा तक्रार वजा अर्ज परदेशी यांनी मनपा आयुक्तांना सादर केला आहे. महापालिका अधिनियमातील कलम २१ (१) नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या सार्वजनिक रस्त्यांवरील किंवा त्याच्याकडेने असलेली झाडे तोडण्याचा अधिकार बांधकाम विभागाला आहे़ मात्र नगरसेवक परदेशी यांच्या तक्रारीमुळे बांधकाम विभागाने वृक्ष समितीला अर्ज दिल्याची चर्चा मनपा आवारात होती़
धुळयात ९२ वृक्षांच्या तोडीसाठी बांधकाम विभागाचा मनपाकडे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:42 AM
नगरसेवक नरेंद्र परदेशी यांची हरकत, बांधकाम विभागाला वृक्षतोडीचा अधिकार
ठळक मुद्दे- पांझरा नदीकाठच्या रस्त्यांना वृक्षांचा अडथळा - बांधकाम विभागाला अधिकार असतांना मनपाकडे अर्ज- नगरसेवक नरेंद्र परदेशी यांची आयुक्तांकडे हरकत