नियमित मास्कचा वापर, शारीरिक अंतर पाळणे, वेळोवेळी हात धुणे या शासन निर्देशांचे रूपांतर ग्रामस्थांच्या सवयींत होऊ लागल्याचे आशादायी चित्र आहे. जिल्हाधिकारी श्री. संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वानमथी सी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप माळोदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वर्तन बदलांमध्ये शासकीय यंत्रणा महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या दोन मुख्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. प्रामुख्याने या कक्षाकडून वर्तणूक बदलासंदर्भातील विविध उपक्रम संवाद/ प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध अभियान उपक्रमांमध्ये जिल्हा परिषदेचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात प्रत्येक गावात किमान एक स्वयंसेवक स्वच्छाग्रही म्हणून काम करीत आहे. स्वच्छतेचा आग्रह धरणारा असा हा जिल्हा परिषद कर्मचारी व स्वच्छाग्रही म्हणजे गावातील ग्रामीण जनतेसाठी वर्तणूक बदलासाठी विविध संवाद साधणारा व स्वच्छ भारत मिशन मध्ये सक्रिय सहभाग घेणारा महत्वपूर्ण घटक आहे. सध्या सर्वत्र कोरोना आजाराने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून स्वच्छ भारत मिशनमधील हा स्वच्छाग्रही जाणीव-जागृतीच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाला आहे.
अनेक गावांमध्ये दवंडी देणे, छोट्या लाऊड स्पीकर वरून कोविड १९ आजारांबाबत माहिती देणे, पारंपरिक गीते सादर करून लोकांमध्ये आजाराबाबत शास्त्रीय माहिती पोहोचविणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, नियमित मास्क वापरणे, वेळोवेळी (दर दोन तासांनी) साबणाने हात धुणे आदी उपक्रम स्वच्छाग्रही राबवित आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपलब्ध असलेले साहित्य गावातील घराघरापर्यंत पोचवण्यात स्वच्छाग्रहीचे महत्त्वाची भूमिका राहिली आहे. कोविड १९ आजारासंदर्भात ग्रामीण भागात सुरू असलेली जाणीव जागृती मोहीम आता जोर धरत आहे, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व संबंधितांनी जाणीव जागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी ग्रामीण भागातील काम करणाऱ्या सर्व संबंधितांना दिल्या आहेत. जनतेलाही सहभागी होण्यासाठी व कोरोना महामारी विरोधातील चळवळीत सक्रिय होऊन शासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.