लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील तापी आणि पांझरा या दोन प्रमुख नद्यांवरील १९ घाटांवरुन अधिकृत वाळू उत्खननासाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. हरित लवादाच्या आदेशाच्या अधीन राहून सर्व १९ घाटांवर वाळू उत्खननास मंजुरी देण्यात येणार आहे. १९ घाटांवरुन ५८ हजार ४२८ ब्रास वाळू उत्खननास मंजुरी मिळाली असून या माध्यमातून शासनाला २१ कोटी ९६ लाख ६६ हजार ६८५ रुपयांच्या मसुलाची अपेक्षा आहे. दरम्यान, या वाळू घाटांसाठी १२ रोजी ई लिलाव प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील तापी आणि पांझरा या दोन प्रमुख नदी पात्रातून अधिकृत वाळू उत्खननासाठी जिल्हास्तरीय तज्ज्ञ मूल्यांकन समिती समिती व जिल्हास्तरीय पर्यावरण आघात निर्धारण प्राधिकरणाच्या अटी व शर्तीनुसार १९ घाट निश्चित केले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत किंवा वाळू घाटातील वाळूसंपेपर्यंत उत्खननाची अनुमती देण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात प्रमुख प्रवाही नद्यांवरील वाळु उत्खननासाठी गौण खनिज विभागाच्या वाळु घाटांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानंतर ग्रामसभांमध्ये चर्चा करण्यात आली. ग्रामसभांमधील चर्चेअंती जिल्हा प्रशासनाने १९ वाळू घाट निश्चित केले. गेल्यावर्षी २० वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया झाल होती. या वाळू घाटांसाठी १२ कोटी ५३ लाखांची सरकारी बोलीची किंमत निश्चित झाली होती. यावर्षी १९ वाळू घाटांची सरकारी किंमत (अपसेट प्राईज) २१ कोटी ९६ लाख ६६ हजार ६८५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तापी आणि पांझरा नदी पात्रातील या १९ घाटांवरुन ५८ हजार ४२८ ब्रास वाळुच्या उत्खननास अनुमती देण्यात आलेली आहे.गेल्यावर्षी २० पैकी पाच वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद मिळू शकला होता. त्यात शिंदखेडा तालुक्यातील हिसपूर व वरली, शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड, सावळदे व खर्दे खुर्द या गावांचा समावेश होता. त्यात देखील हरित लवादाच्या आदेशा नुसार पाणीखालील वाळु सक्शन पंपाच्या आधारे उत्खननास एप्रिल महिन्यात मनाई करण्यात आली होती. यावर्षी हरित लवादाच्या आदेशाच्या अधिन राहुन वाळू घाटाच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.म्हणजे वाळु ठेकेदारांना वाळु उत्खनन करतांना सक्शन पंपाचा वापर वर्ज्य राहणार आहे. परिणामी वाळू ठेकेदारांना वाळु उत्खनन करतांना मनुष्यबळाचा वापर करुनच वाळु उत्खनन करण्याच अनुमती देण्यात येणार आहे.
अशी राहिल लिलावाची प्रक्रिया वाळूच्या लिलावात सहभागी होण्यासाठी ४ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. तर ११ डिसेंबरपर्यंत ई निविदा सादर करावयाच्या आहेत. १२ डिसेंबरला निविदा उघडण्यात येणार असून दिवसभर ई लिलाव चालणार आहे. १३ डिसेंबरला अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील १९ वाळू घाट असे...
साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरुन दातर्ती १, दातर्ती २, शिंदखेडा तालुक्यात तापी नदीवर कमखेडा , आच्छी १ , आच्छी २ , हिसपूर १ , हिसपूर २ , टाकरखेडा , शिरपूर तालुक्यातील साहूर , जापोरा , उप्परपिंड १, उप्परपिंड २, पाथर्डे, खर्दे खुर्द, सावळदे, कुरखळी -१ , कुरखळी २, वाठोडे, तºहाडी या वाळू घाटांचा समावेश आहे.