लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान महाविद्यालयात अस्थिव्यंग दिव्यांग निवासी शाळा, नगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वार्षिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.कला महोत्सवाचे उद्घाटन सिप्ला मेडीसीनचे क्षेत्रीय व्यवस्थापक कनवरसिंह देवेंद्रसिंह जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जया प्रमोद पाटील होत्या. प्रारंभी कापडणे येथील वीरपत्नी नूतन संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध शालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कला महोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, पारंपारिक, रिमिक्स गीतांवर नृत्य, लावणी, गरबा सादर केले. तसेच अस्थिव्यंग व दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनींनी समाज प्रबोधनात्मक नाटिका सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यात हुंडाबळी व स्त्रीभ्रूण हत्या, मोबाईलचे साईड इफेक्ट, लेक वाचवा, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांवर नाटिका सादर करण्यात आल्या. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद देत रोख रकमेची बक्षिसे दिली.याप्रसंगी नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, उपाध्यक्ष माधुरी शशिकांत भदाणे, गंगामाता विद्यालयाचे प्राचार्य, सुनिल तुकाराम पाटील, स्वप्निल शशिकांत भदाणे, कोषाध्यक्ष अक्षय शशिकांत भदाणे, नेहा कनवरसिह जाधव, दिलीप भटू पाटील, ग्रामसेवक शामकांत शिवाजी बोरसे, अस्थिव्यंग दिव्यांग निवासी शाळेचे मुख्याध्यापक शितल स्वप्नील भदाणे, माध्यमिक शिक्षिका स्वाती अक्षय भदाणे, आदर्श विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा अशोक पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल पाटील, जगन्नाथ पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगाव व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प संचालक राजेंद्र नेरकर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक बी.एन. पाटील, विद्यार्थिनी पौर्णिमा कमलेश पाटील यांनी केले. आभार शिक्षिका माधुरी भदाणे यांनी मानले.