विशाल गांगुर्डे/ पिंपळनेर (धुळे) - भविष्यात पर्यावरणासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज ठरणार आहे. शहरात सिमेंटचे जंगल असल्याने, मातीचा अभाव जाणवतो. त्याला पर्याय म्हणून पिंपळनेरच्या गौरव बिरारीस या तरुण संशोधकाने कागदापासून माती बनविण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. या कृत्रिम मातीवर वृक्ष संवर्धन केले जाऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करण्याची गरज निर्माण होणार आहे. यासाठी प्रत्येकवेळी माती लागणार आहे. त्या वेळी माती मिळणे शक्य होणार नाही. माती ही जड असल्याने त्याचे वजन वाढेल. यावर उपाय म्हणून गौरव यांनी कागदापासून माती बनविली आहे. या मातीतून घरातही छोट्या-मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन केले जाऊ शकते.
माती तयार करताना गौरव यांनी २० प्रकारच्या टाकाऊ घटकांचा उपयोग केला आहे. कागदाच्या मातीचा चिखल होत नाही. यात एखादे छोटे रोप लावल्यास वृक्षाला पाणी देताना त्याची साठवण क्षमता टिकून ठेवते. या मातीचा वापर प्लॉट, घर, हॉटेलमध्ये केल्यास वृक्षसंवर्धन सहज होते. ही माती वजनाने अत्यंत हलकी आहे. एखाद्या उंच इमारतीवर, प्रत्येक प्लॉटमध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी ही कृत्रिम माती बहुउपयोगी आहे.
कुठल्याही प्रकारचे वृक्ष या मातीत सहज जगतात. कागदापासूनच्या मातीला पाहिजे तो आकार देऊन त्यात वृक्ष लागवड करता येऊ शकते. या कृत्रिम मातीत वृक्ष लागवड केल्यास पर्यावरणाचा समतोल राखून त्याचे संवर्धन सहज टिकवून ठेवता येऊ शकते, हे गौरवने सिद्ध केले आहे. त्याने पुण्यात ‘सस्टेन सॉईल’चा व्यवसाय सुरू करीत, त्याचे पेटंट मिळविले आहे. या व्यवसायाची जबाबदारी सध्या तेजस भामरे, नीलेश पाटील यांच्याकडे आहे.अनेक विषयात संशोधनगौरव शांताराम बिरारीस हे बल्हाणे ता. साक्री जि. धुळे येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण एम.टेक.पर्यंत झाले आहे. आतापर्यंत वनस्पतीमधील उर्जेचे मूल्यांकन, कृत्रिम नत्र स्थिरीकरण, नील व अतिनील किरण रोखणाºया पारदर्शक काचेचे तंत्र यावर संशोधन केल्याचा त्यांचा दावा आहे.