राजेंद्र शर्मा
धुळे : शहरातील सराफ बाजारातील एका सराफ व्यावसायिकाला त्याच्याकडे काम करणाऱ्या पश्चिम बंगालमधील कारागिराने सुमारे ११ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफ व्यावसायिक केयूर शहा (रा. अग्रवालनगर, धुळे) यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ५ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्यासुमारास शहरातील त्यांच्या मालकीच्या एस. कांतिलाल ॲण्ड ज्वेलर्स या दुकानात अमिरुद्दीन वाहीद मलिक (वय ३४, रा. शिवाजीनगर, झोपडपट्टी, धुळे) हा तरुण दागिने घडविण्याचे काम करत होता. त्याच्याकडे १० लाख ९८ हजार ३२८ रुपये किमतीचा १७१.९९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा दागिने घडविण्यासाठी दिलेला होता. पण, त्या तुकड्यातून दागिने न घडविता त्याने मालकाचे लक्ष विचलित करून सोन्याचा तुकडा घेऊन पोबारा केला.
ही बाब लक्षात आल्यानंतर सुरुवातीला त्याचा शोध घेण्यात आला. पण, तो कुठेही सापडला नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिक शहा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अमिरुद्दीन वाहीद मलिक याच्याविरोधात फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक ए. एस. बागुल घटनेचा तपास करीत आहेत.