लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील आर्वी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कापड दुकानात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास हातसाफ केल्याची घटना घडली़ चोरट्याने ४० हजार रुपये किंमतीच्या कपड्यांची चोरी केली आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ राजेंद्र शिवराम पाटकर (५२, रा़ आर्वी ता़ धुळे) यांचे आर्वी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकेश रेडीमेड नावाचे कापडाचे दुकान आहे़ सोमवारी सायंकाळी लवकर नेहमीप्रमाणे पाटकर यांनी दुकान बंद केले आणि घरी रवाना झाले़ चोरट्याने ही संधी साधून हातसफाई केली़ चोरट्याने ७ नववारी साड्या, ९० सहावारी साड्या, बनियनचे २ बॉक्स असा एकूण ४० हजार ६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ चोरीची ही घटना मंगळवारी पहाटे घडली़ सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले़ सर्वत्र शोधाशोध करुनही त्याचा काही उपयोग झाला नाही़ चोरीची ही घटना लक्षात घेता धुळे तालुका पोलीस ठाण्यात पाटकर यांनी रितसर फिर्याद नोंदविली़ याप्रकरणी चोरट्याविरुध्द भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करीत आहेत़ दरम्यान, चोरीच्या या घटनेची गावात चर्चा होत आहे़
आर्वीत चोरट्याने फोडले कापड दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 6:24 PM