देवेंद्र पाठक, धुळे: आंतराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक तथा देशातील प्रतिथयश मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. आशिष पाटील यांच्या संशोधनाला पेटेंट मिळाले आहे. आता त्यांच्याकडे एकूण सात पेटेंट झाले असून ते देशातील ७ पेटेंट मिळणारे पहिले आणि एकमेव डॉक्टर ठरले आहेत.
पीसीएनएल या एक टाका मुतखड्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या पाठीतून किडनीपर्यंत जाण्यासाठी दुर्बीण टाकावी लागते. दुर्बीण टाकण्यासाठी रुग्णाच्या पाठीवर अचूक ठिकाणी जागा करावी लागते. त्यासाठीचे हे संशोधन आहे. हे त्रिकोणमिती प्रणालीवर तयार करण्यात आलेले आहे. रुग्णाच्या पाठीवर दुर्बीण टाकण्यासाठी अचूक जागा, अशा पद्धतीने करावी लागते की, जेणेकरून ती बरोबर किडनीपर्यंत मुतखडा असलेल्या जागेवर जाईल. दुर्बीण टाकण्यासाठी अशा प्रकारची अचूक ठिकाणी जागा करण्यासाठी सर्जनला खूप सरावाची गरज असते. अनेकवेळा पीसीएनएल केल्यानंतर सर्जनला अचूकपणे दुर्बीण टाकण्यासाठी जागा करता येते. नेमकी हीच गरज ओळखून डॉ. आशिष पाटील यांनी हे संशोधन केले आहे.
या संशोधनामुळे नवोदित सर्जन यांना कमी वेळेत पीसीएनएल करण्यासाठी दुर्बीण टाकण्यासाठीची अचूक ठिकाणी जागा करता येणार आहे. यासाठी डॉ. पाटील यांनी ऑपरेशन टेबलवर लावता येईल, अशी एक फ्रेम विकसित केली आहे. त्यावर रुग्णाला झोपविण्यात येते. या फ्रेमच्या साहाय्याने सर्जन रुग्णाच्या पाठीवर दुर्बीण जाण्यासाठी अचूक ठिकाणी जागा करू शकतो, असा दावा डॉ. पाटील यांनी संशोधनाच्या माध्यमातून केला आहे. त्यांच्या दाव्यावर पेटेंट विभागाने विविध चाचण्या करून पाहिल्या व त्या सर्व चाचण्यांमध्ये डॉ. पाटील यांचे दावे सिद्ध झाले आहे. त्यानंतर पेटेंट कार्यालयाने पेटेंट प्रमाणित केले आहे. या संशोधनामुळे सर्जनबरोबरच रुग्णालाही मोठा फायदा होणार असून पहिल्या प्रयत्नातच अचूकपणे दुर्बीण जाण्यासाठीची जागा करता येणार असल्याने सर्जनचा आत्मविश्वास वाढीस येऊ शकणार आहे. दरम्यान, डॉ. पाटील यांना सातवे पेटेंट मिळाल्याने त्यांच्यावर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवोदित सर्जनला पीसीएनएलचे गुण चुटकीसरशी आत्मसात करता यावे, या उद्देशाने हे संशोधन असून याद्वारे नवोदित सर्जनला अचूकपणे रुग्णांच्या पाठीवर दुर्बीण टाकण्यासाठी जागा करता येणार आहे. त्यामुळे सर्जनच्या आत्मविश्वास वाढीस मोठी मदत मिळणार आहे.- डॉ. आशिष पाटील, मूत्ररोग तज्ज्ञ तथा ७ पेटेंट मिळणारे देशातील एकमेव डॉक्टर