धुळे : शिरपूर तालुक्यातील कुवे गावात ट्रान्सफाॅर्मरवरून विद्युत जोडणी घेण्याच्या वादातून सहा जणांच्या जमावाने दोन जणांवर प्राणघातक हल्ला केला असून याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. दुसऱ्या गटानेदेखील फिर्याद दिली आहे.
कुवे, ता. शिरपूर गावात मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमाराला कैलास नारायण पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यात ही घटना घडली. ट्रान्सफाॅर्मरवरून विद्युत जोडणी घेण्यावरून दोन जणांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान मोठ्या हाणामारीत झाले. सहा जणांच्या जमावाने कुऱ्हाड, चाकू, लोखंडी राॅड आणि दगडांच्या सहाय्याने नारायण बारकू पाटील, राहुल नारायण पाटील, कैलास नारायण पाटील या तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या तिघांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दुपारी सव्वादोन वाजता घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
याप्रकरणी कैलास नारायण पाटील (३१, रा. कुवे ता. शिरपूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर बारकू पाटील, गणेश मनोहर पाटील, मुकेश मनोहर पाटील, सतीश मनोहर पाटील, राधाबाई मनोहर पाटील, मनीषा गणेश पाटील सर्व रा. कुवे, ता. शिरपूर यांच्याविरुध्द शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३२५, ३२४, ३२३, १४३, १४४, १४७, १४९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. आहेर करीत आहेत.
दुसऱ्या गटातील मनोहर बारकू पाटील (६५, रा. कुवे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विद्युत जोडणीसाठी पैसे भरले असून सदर पोलवर आकडे टाकून वीजचोरी करू नका असे सांगितल्याचा राग आल्याने काठी आणि विटांच्या सहाय्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात गणेश मनोहर पाटील, सतीश मनोहर पाटील, राधाबाई मनोहर पाटील, मनीषा गणेश पाटील हे जखमी झाले. याप्रकरणी नारायण झिपा पाटील, कैलास नारायण पाटील, राहुल नारायण पाटील यांच्याविरुध्द भादंवि कलम ३२४, ३३७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक आर.ए. एडावत करीत आहेत.