धुळेॅ- शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास मालेगाव येथुन अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याजवळून टीव्ही, विविध धातूच्या वस्तू, दुचाकी असा १ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आझादनगर पोलिसांनी केली आहे.
ईमरान रफीक शेख (वय २३, रा. ११ हजार खोली, मालेगाव,जि.नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.धुळे शहरातील नित्यानंद नगरातील रहिवासी अश्विनी सुहास लळीत यांचे बंद असलेल्या घरातून चोरट्याने १६ मार्च रोजी २३ एलईडी टीव्ही, तांबे व पितळाच्या देवतांच्या मूर्ती असा एकूण २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी आझादनगर पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, चोरी करणारा सराईत गुन्हेगार इमरान रफीक शेख (वय २३) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून टीव्ही, देवतांच्या मूर्ती, तसेच गुन्हा करताना वापरलेली दुचाकी (क्र. एमएच १५-डीडी१७९०) असा एकूण १ लाख ७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीविरूद्ध धुळे व मालेगाव येथे चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद पाटील, हेड कॅान्स्टेबल आरीफ सैय्यद, प्रकाश माळी, योगेश शिरसाठ, संदीप कढरे, चंद्रकात पाटील, राजू ढिसले, आतिक शेख, सुनील शेंडे, अजहर शेख, शोएब बेग, सिद्धांत मोरे, संतोष घुगे यांच्या पथकाने केली.