लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील ज्या कलावंतांची मानधनासाठी निवड झाली आहे. त्यांना त्वरित मानधन सुरू करावे. यांसह अन्य मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील ५०० कलावंत सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी येथे भजन व भारूड सादर करून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने एकतारी, भारूड, लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, आराधी, टिंग्रीवाला व सर्व स्थानिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील कलावंतांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी कलावंतांनी त्यांच्यातील उपजत कलागुणांचे येथे सादरीकरण करून त्यांचे प्रलंबित प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला.
गळवण, अभंग, लोककलांनी वेधले लक्ष प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजना, व्यसनमुक्ती, दारूबंदी, घर तेथे शौचालय, पाणी आडवा, पाणी जिरवा, हुंडाबंदी, बेटी बचाव, ग्रामस्वच्छता अभियान आदी विषयांवर येथे प्रबोधन केले. त्यानंतर आंदोलनात सहभागी कलावंतांनी भजन, कीर्तन, गवळण, अभंग, लोकगीते, लोककला, भारूड आदी विविध कला सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी जिल्हा परिषदेचे सीईओ गंगाथरन देवराजन यांना निवेदनही देण्यात आले.
पदाधिकाºयांनी दिले आश्वासन आंदोलन सुरू असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, धुळे जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्याम सनेर व समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत; त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. या वेळी प्रदेश महासचिव नानाभाऊ वाघ, प्रदेश उपाध्यक्ष फुला गवळे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, तालुकाध्यक्ष संजय सोनार, पांडुरंग माळी, निंबा चौधरी, ताराचंद गवळे, शिवाजी खैरनार, जामसिंग गिरासे, मच्छिंद्र मिस्तरी, दिगंबर वाघ, राजेंद्र वाघ, मन्साराम पाटील, नाना माळी, गजू माळी, दीपक पाटील, ज्ञानेश्वर माळी, काळू पाटील आदी उपस्थित होते.