लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ६०० सहकारी संस्थांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर केलेला नसल्याने येत्या काळात त्यांच्या अडचणी वाढणार आहेत़ सहकार विभागाकडून वारंवार कळवूनही या संस्था लेखापरीक्षण अहवाल सादर करत नसल्याचे संबधित विभागाचे म्हणणे आहे़ नंदुरबार जिल्ह्यात विविध कार्यकारी संस्था, आदिवासी विकासो, मजूर सहकारी संस्था, बँका यासह विविध संस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण केल्यानंतर ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना सादर करण्यात येते़ दरवर्षी हा उपक्रम लेखापरीक्षक आणि संस्था यांच्याकडून करण्यात येतो़ एक एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षात करण्यात येणाºया जमाखर्चाची नोंद करून तो अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे़ असे असतानाही, यंदा तब्बल ६०० सहकारी संस्थांनी लेखापरीक्षणच सादर केलेले नाही़ या संस्थांना वारंवार सूचना करूनही त्यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली नाही़ यामुळे विभागाकडून या संस्थांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे़ २०१६-१७ या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांनी केलेल्या कामकाजाचे लेखापरीक्षण सादर करण्यासाठी या संस्थांना सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ सप्टेंबरपर्यंत लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाºया संस्थां किंवा पदाधिकारी यांच्यावर शिस्तभंग कारवाई तसेच संबधित संस्थेची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना असल्याने येत्या दीड महिन्यात लेखापरीक्षण सादर न करणाºया सहकारी संस्थांची मोठी धावपळ होणार आहे़ विभागाकडून तालुकानिहाय संस्थांना नोटीसा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ या संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आजअखेरीस जिल्ह्यातील १५० सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे़
२० जुलै रोजी होणार आढावा बैठक याबाबत उपनिबंधक एस़वाय़पुरी यांच्याकडून माहिती घेतली असता, त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्वाधिक लेखापरीक्षण झालेल्या संस्था ह्या नंदुरबार जिल्ह्यातून आहेत़ यंदा संप्टेबरपर्यंत मुदत आहे़ या कालावधीत संस्था येऊन त्यांचा अहवाल सादर करतील, अहवाल न सादर करणाºया सहकारी संस्थांवर कारवाई करण्यात येईल़ गंभीर त्रुटी आढळून येणाºया संस्थांच्या नोंदण्या रद्द करण्याची कारवाईही विभागाकडून होऊ शकते़ जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण अहवालाबाबत चर्चा करण्यासाठी २० जुलै रोजी जिल्हा बँकेच्या नंदुरबार शहरातील मुख्य शाखेत बैठक होणार आहे़ सकाळी ११ वाजता होणाºया बैठकीत संस्थांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे़ २० जुलै रोजी होणाºया या बैठकीत नेमक्या किती संस्थांचे पदाधिकारी आणि लेखापरीक्षक हजेरी लावणार याकडे लक्ष लागून आहे़ जास्तीत जास्त पदाधिकाºयांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न विभागाकडून सुरू आहे़
१५ दिवसात वाढली संख्या नंदुरबार जिल्ह्यात एकूण ७७० नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात २६६, शहादा २५६, तळोदा ८५, अक्कलकुवा ३१, नवापूर ९६, तर धडगाव तालुक्यातील ३६ संस्थांचा समावेश आहे़ यात २२ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत नंदुरबार तालुक्यात ३७, शहादा १०, तळोदा १५, अक्कलकुवा ५, नवापूर ११ आणि धडगाव तालुक्यातील केवळ ३ संस्थांनी लेखापरीक्षण पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर संबंधित विभागाने केलेल्या कारवाईनुसार गेल्या १५ दिवसात या संख्येत वाढ होऊन ती संख्या १५० वर गेली आहे़ जिल्ह्यातील ७७० सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी तब्बल ५१ लेखापरीक्षकांना सोपवण्यात आली होती़ जिल्हा उपनिबंधक यांनी घेतलेल्या बैठकीत केवळ १९ लेखापरीक्षकांनी उपस्थिती दिली होती़ यात गैरहजर असलेल्या ३२ लेखापरीक्षकांना नोटिसा काढण्याच्या सूचना जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक यांनी केल्या होत्या़ त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाने कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे़