धुळे : शहरातील लहान पुलाचे आॅडीट कधी होणार? असा सवाल उपस्थित करत त्याअभावी वर्दळ थांबल्याने नागरीकांचे हाल होत असल्याची ओरड स्थायी समितीच्या सभेत सदस्यांकडून झाली़ पाईप लाईन व नवीन व्हॉल्व टाकण्याचा विषय तहकूब ठेवत अन्य विषय मंजूर झाले़ महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची सभा पार पडली़ यावेळी सभापती युवराज पाटील, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ तसेच सदस्या लक्ष्मी बागुल व्यतिरिक्त विमलबाई पाटील, सुनील सोनार, नागसेन बोरसे, रावसाहेब पाटील, संतोष खताळ, सुरेखा उगले, सुरेखा देवरे, कशीश उदासी, संजय भील, मुक्तार मन्सुरी, शेख शाहजहान बी बिस्मिल्ला, सुभाष जगताप, अन्सारी सईदा म़ इकबाल, अमीन पटेल उपस्थित होते़ लहान पुलाच्या आॅडीटबद्दल सभेत विषय निघाल्यानंतर अभियंता कैलास शिंदे यांनी सांगितले, १९६४-६५ मध्ये लहान पुलाची निर्मिती झाली़ त्याला बराच काळ झाल्याने पुल जिर्ण झाला आहे़ अतिवृष्टी झाल्याने पुल खराब झाला़ परिणामी वर्दळीसाठी तो बंद करण्यात आला़ दुरुस्तीसंदर्भात निविदा काढण्यात आली आहे़ लवकरच काम मार्गी लावले जाईल़ विविध पातळीवर पुलाची तपासणी केली जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले़ स्वच्छता आणि शौचालयाच्या साफसफाईप्रकरणी ठेकेदाराची मनमानी सुरु असून बोगस कामगार, कर्मचारी दाखवून बिले काढून घेऊन ठेकेदार महापालिकेला चूना लावत असल्याचा आरोप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी केला़ यावर चंद्रकांत जाधव यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणी चौकशी केली जाईल असे उपायुक्त गोसावी यांनी सांगितले़ अमीन पटेल यांनी शाळा आणि त्यातील सुविधांचा मुद्दा उपस्थित केला़ काही शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़ स्वच्छता नाही़ शिकविण्याची वाणवा असल्यामुळे विद्यार्थी महापालिकेच्या शाळा सोडून जात असल्याचा आरोप केला़ यावर शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी हा मुद्दा खोडून काढला़ असा काहीही प्रकार नसल्याचे ठासून सांगत १५० च्यावर विद्यार्थी काही शाळांमध्ये असल्याचे सांगितले़ दरम्यान, धुळे शहरातील विविध ठिकाणी पाईप लाईन दुरुस्त व नवीन व्हॉल्व टाकण्याचे काम करुन घेण्यात आले़ त्यासाठी लागणाºया खर्चास मंजूरीचा विषय चर्चेअंती तहकूब ठेवण्याचा आदेश सभापती यांनी दिला़
आॅडिटमुळे लहान पुलाची दुरुस्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:05 PM