लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : शासनाच्या कृषी विभागातर्फे पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. या केंद्राद्वारे शेतकºयांना हवामानाची अद्ययावत माहिती मिळणे आता शक्य होणार आहे. महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र हे राज्य शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्या खासगी भागीदारीतून कृषी विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. यासाठी ‘वेध हवामानाचा, ध्यास शेतकरी कल्याणाचा’ या ब्रीद वाक्याप्रमाणे या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून ५ गोष्टींची माहिती शेतकºयांना मिळणार आहे. यात पाऊस, हवेची दिशा, हवेची गती, तापमान व आर्द्रता यांची प्रत्येक तासागणीक माहिती महावेधच्या पुणे, मुंबई, नोएडा येथील कार्यालयांना प्राप्त होईल. या माहितीमुळे पिंपळनेरसह परिसरातील स्थानिक शेतकºयांनाही त्याचा फायदा होणार आहे. महावेध स्वयंचलित हवामान केंद्र सुरू होऊन या भागातील माहिती संकलित करण्याचे कामही सुरू झाले आहे. या हवामान केंद्राला पर्जन्यमापक (रेन गेज) बसविण्यात आले असून किती पाऊस झाला, ही माहितीही कळणार आहे. हवामान केंद्राला जीपीआरएस सिस्टिम असून यासंदर्भातील सर्व माहिती संकलित होऊन मुख्यालयास वेळ निश्चित केल्यानुसार कळणार आहे. या केंद्रात बॅटरी चार्जिंगसाठी सोलर प्लेट बसविण्यात आली आहे, तसेच एरिअलने जीपीआरएस सिस्टिमला देण्यात आला आहे. सर्वात उंचावर अल्ट्रासॉनिक बसविण्यात आले आहे. यामुळे हवेची दिशा व गती त्याचबरोबर तापमान व आर्द्रता कळणार आहे. सदर हवामान केंद्र हे आतापर्यंत पिंपळनेर, दहिवेल, देवजीपाडा, कुडाशी, कासारे, उंभरपाटा, जैताणे येथे बसविण्यात आले असून साक्रीतही हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे हवामान केंद्र स्थापनेचे काम सन्नी सिंग, विलास गोपाल यांच्यासह युवराज चौधरी यांनी केले. दोन महिन्यापूर्वी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पिंपळनेर येथे एका कार्यक्रमाप्रसंगी आले होते. त्यांनी शेतकºयांना हवामानाची माहिती व्हावी, यासाठी संपूर्ण राज्यात अंदाजे २ हजारांपेक्षाही जास्त हवामान केंद्रांची उभारणी राज्य सरकारतर्फे केली जाणार असल्याची घोषणा केली होती.
स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी
By admin | Published: July 09, 2017 1:12 AM