धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवास थाटात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी दिवसभरात 1200 चिमुकल्या मुलांचे जाऊळ काढण्यात आले. तसेच कुळधर्म, कुलाचारासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलल्याचे चित्र दिसून आले. सालबादप्रमाणे यंदाही एकवीरादेवीचा यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी चतुर्दशीच्या दोन तिथी आल्यामुळे काही भाविकांनी रविवारी त्यांच्या मुलांचे जाऊळ काढले; तर आज चतुर्दशीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे खान्देशातून अनेक भाविक त्यांच्या मुलांचे जाऊळ काढण्यासाठी मंदिर परिसरात सकाळपासूनच दाखल झाले होते. जाऊळ काढण्यासाठी मुलांची एकच गर्दी झाल्यामुळे मंदिर परिसरात नाभिकांची बरीच शोधाशोध करावी लागली. आज पालखी मिरवणूक एकवीरादेवी भगवतीची पालखी व शोभायात्रा मंगळवारी, 11 रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सुरुवात मंदिरापासूनच होणार आहे. पारंपरिक मार्गावरून शोभायात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत विविध शाळेतील विद्यार्थी लेझीम व पारंपरिक नृत्य सादर करणार आहे. या मिरवणुकीत वारकरी संप्रदायाचे पथकही राहणार आहे. तत्पूर्वी मंदिर संस्थानचे मुख्य ट्रस्टी सोमनाथ गुरव यांच्या हस्ते महाअभिषेक व पाद्यपूजेचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्या एस. उपस्थित राहणार आहेत. दहा दिवस चालणार यात्रोत्सव कुलस्वामिनी एकवीरादेवीचा यात्रोत्सव दहा दिवस चालणार असल्याची माहिती एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. यानिमित्ताने यात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. मंदिर ते पंचवटीर्पयत थाटली विक्रेत्यांनी दुकाने एकवीरादेवी मंदिर ते पंचवटीर्पयत विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. या दुकानांच्या मागे पांझरा नदी पात्रात बच्चे कंपनीसाठी आकर्षण ठरणारे पाळणे व मनोरंजनाची साधने राहणार आहेत. प्रत्यक्षात मंगळवारपासून पाळण्यात बसण्याची मजा बच्चे कंपनीला लुटता येणार आहे. गेल्यावेळी पाळण्यात बसण्याचे जे शुल्क आकारले जात होते. तेच शुल्क यावर्षीही घेतले जाणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
दिवसभरात 1200 चिमुकल्यांचे जाऊळ
By admin | Published: April 11, 2017 12:25 AM