निजामपूर : परंपरेनुसार सातव्या दिवशी गावातील गणेश मंडळांनी टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला. नाशिक येथून बोलविण्यात आलेल्या वारकरींच्या विशेष पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.यंदा वरुणराजाने कृपा केल्यामुळे सर्व गणेशभक्त आनंदी होते. गावातील आझाद चौकातील युवक गणेश मित्र मंडळाच्या दादा गणपतीचे हे ५५ वे वर्ष असून या मंडळासह मेन रोड वरील झुंझार गणेश मंडळ गणपतीची विसर्जन मिरवणुक सायंकाळी निघाली. या दोघा मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत नासिक येथून आलेले ५० वारकºयांचे पथक सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मिरवणुकीत टाळ, मृदुंगाच्या तालावर वारकरी नाचत होते. मिरवणुकीत मंडळाकडून गुलालाची उधळण करण्यात होती. मेन रोड वरील एकता गणेश मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत साक्री नगरपालिकेचे सभापती सुमित नागरे, कासारे माजी प.स. सदस्य गोकुळ परदेशी उपस्थित असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष परेश पाटील यांनी दिली. श्रीराम गणेश मंडळाचे गणेश विसर्जन सायंकाळी झाले होते. भावसार गल्लीतील ओम साई गणेश मंडळ, कॉलनीतील प्रगती फांउडेशन, सिध्दी विनायक गणेश मंडळ, आई तुळजा भवानी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूका रात्री सुरु होत्या. आई तुळजा भवानी मंडळाने फटाक्यांची आतिषबाजी केली. गावातील गांधी चौकातील नव आदर्श व आदर्श गणेश मंडळाची मिरवणूक ही रात्री सुरु होती. गणेश मंडळांचे गावात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते.
टाळ, मृदुंगाच्या गजरात निघाली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 9:59 PM