धुळे : प्रवाशांच्या सोयीसाठी देवपूर बसस्थानक सुरू करण्यात आलेले आहे. मात्र लांब पल्याच्या बसगाड्यांचे चालक या स्थानकात बस न नेता परस्पर नेतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तसेच मध्यप्रदेश परिवहनच्या बसेस या ठिकाणी येत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते. या स्थानकात शिरपूर, नंदुरबारकडे जाणाºया सर्व जलद बसेस आल्या पाहिजेत अशी प्रवाशांची मागणी आहे. धुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. देवपूरसह नगावबारी, वलवाडी, वाडीभोकर, नेहरूनगर, विद्यानगरी व लगतच्या परिसरातील प्रवाशांना महामंडळाच्या बसने प्रवास करायचा असल्यास, जवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावरील मध्यवर्ती बसस्थानकातच यावे लागत होते. त्यामुळे देवपुरला बसस्थानक व्हावे अशी मागणी सुरू झाली. देवपूर बसस्थानक कृती समितीने यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. सहा वर्षांपूर्वी बीओटी तत्वावर येथे प्रशस्त बसस्थानक बांधण्यात आले. बसस्थानक झाल्याने, या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.बसस्थानकाचा डोलारा मोठा असला तरी तो प्रवाशांसाठी फायदेशीर नाही. या बसस्थानकातून सकाळी ६ वाजता पहिली बस सुटते. तर शेवटची बस रात्री ९ वाजता सुटत असते. दिवसभरात या स्थानकात शेकडो बसेस येतात व जातात असे महामंडळाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या बसस्थानकासमोरील मार्गावरून शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नंदुरबार, शहादा, औरंगाबाद भोपाळ, उज्जैन या शहरांकडे बसेस जात असतात. साध्या तसेच ग्रामीण भागात जाणाºया बसगाड्या येथे येत असल्या तरी, जलद गाड्या या ठिकाणी न थांबता परस्पर जात असतात,अशी प्रवाशांची तक्रार आहे. प्रवाशी स्थानकातच बसची वाट पहात असतात. मात्र ती बस केव्हाच निघून गेलेली असते. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना तेथून रिक्षा भाडे खर्च करून मध्यवर्ती बसस्थानकात यावे लागते. यात वेळ आणि पैसा खर्च होतो तो निराळाच. बसस्थानकाची उभारणी प्रवाशांच्या सोयीसाठी झालेली असल्याने, त्याठिकाणी सर्व बस जातील-येतील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मध्यप्रदेशच्या बसेसही येत नाहीमध्यवर्ती बसस्थानकात होणारी गर्दी लक्षात घेता, इंदूरकडे जाणाºया राज्य व मध्यप्रदेशच्या बसगाड्या या देवपूर स्थानकातच थांबतील. तेथून सुटतील असे विभाग नियंत्रकांनी आदेश काढले आहेत. परंतु या स्थानकात इंदूर, उज्जैन, भोपाळकडे जाणाºया मध्यप्रदेश परिवहनच्या बसेस येतच नाही, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणाहूनही मध्यप्रदेशात जाणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे मध्यप्रदेशच्या बसेस येणे गरजेचे आहे. या बसस्थानकात कोणत्या बसेस येतात, कोणत्या परस्पर जातात यावर लक्ष ठेवून स्थानकात जलद बस न आणणाºया चालकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जलद बसेस स्थानकात नेण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 7:03 PM
देवपूर बसस्थानक : बसची प्रतीक्षा करून कंटाळलेल्या प्रवाशांना मध्यवर्ती स्थानकात जावे लागते
ठळक मुद्देdhule