लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेत १९८९ साली झालेल्या बोगस भरतीची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे तत्कालिन धुळे नगरपालिकेच्या सेवेतून कमी करण्यात आलेले कर्मचारी बबन झोटे हे आता २५ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत. महापालिकेने १९८९ मध्ये तत्कालिन राज्यमंत्र्यांनी आर्थिक व्यवहार करून बोगस कर्मचाºयांना न्याय दिला. परंतु काही जणांच्या मुलाखती घेऊनही त्यांना नेमणूकीचे स्वतंत्र आदेश न देता बोगस आदेशात नावे टाकून तत्कालिन नगरपालिकेने आपली फसवणूक केल्याचा आरोप बबन झोटे यांनी केला आहे. राज्यमंत्र्यांच्या आदेशाने जे बोगस कर्मचारी सेवेत सामावून घेतले याची जाणीव ठेवून मनपाने कामगार न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे कारण नव्हते. पण आस्थापनाप्रमुखांची मागणी पूर्ण न केल्याने आमचे नुकसान करण्यात आले, असे बबन झोटे यांच्या निवेदनात नमुद आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने, आपले निवेदन दिशाभूल करणारे असल्याचा खुलासा केला असला तरी आपली मागणी स्वच्छ व सत्य असून बोगस भरतीच्या सीआयडी चौकशीचे आदेश होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे़ सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी २५ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर जलग्रहण करून आमरण उपोषणास बसणार असून आपले काही बरेवाईट झाल्यास धुळे महापालिका व महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असा इशारा झोटे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
बबन झोटेंचा आमरण उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:27 PM
धुळे नगरपालिकेचे तत्कालिन कर्मचारी, मंत्रालयासमोर केला होता आत्मदहनाचा प्रयत्न
ठळक मुद्दे- बोगस भरतीच्या सीआयडी चौकशीची मागणी- मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे आमरण उपोषणाचा इशारा- मंत्रालयासमोर केला होता आत्मदहनाचा प्रयत्न