लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : केवळ राजकारणासाठी राजकारण करायचे नाही, असे भाजपा पक्षाचे धोरण आहे. अगोदरच्या सरकारने देशात ४७ वर्ष २ महिने एक दिवस सत्ता उपभोगली. या काळात त्यांनी केलेली घाण साफ झाली का नाही, असे ते आम्हांला तीन वर्षात विचारू लागले आहेत. त्यांनी देशात करून ठेवलेली वाईट अवस्था आम्ही टप्प्याटप्याने संपवत आहोत. तरीही वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे, आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत, असे संतप्त प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. पांझरा नदी किनारी प्रस्तावित झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन गुरुवारी दुपारी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार अनिल गोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी (ग्रामीण), तेजस गोटे, माजी महापौर मंजूळा गावीत, रजक महासंघाचे राष्टÑीय प्रदेशाध्यक्ष बालाजी शिंदे, परिट समजाचे राष्टÑीय उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, राजेंद्र खैरनार व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहीद अली यांनी केले. आभार विजय वाघ यांनी मानले.
मुलभूत गरजाही देऊ शकले नाही आधीचे सरकार भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वीच्या सरकारने सत्ता उपभोगत असताना केवळ झोप ठोकली. मुलूभूत गरजाही ते जनतेला देऊ शकले नाहीत. २००१ साली राज्यात ६३ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. त्या थांबविण्यासाठी ‘त्या’ सरकारने कुठलीही व्यवस्था केली नाही. केली असती, तर शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले नसते. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या तीन वर्षात जलयुक्त शिवार योजना, मुद्रा योजना, बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न, शेतकºयांची कर्जमाफी केली. देशासह राज्यात विकासाची कामे टप्प्याटप्याने सुरू आहेत. असे असतानाही देशात वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे असताना शिव्या मात्र विद्यमान सरकारला खावे लागत असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी येथे म्हटले.
१५ आॅगस्टला होणार अनावरण कार्यक्रमात सफारी गार्डन अंतिम आराखडा कसा राहिल? यावर आधारित तयार केलेल्या पुस्तिकेचे मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले, की पांझरा नदी किनारी प्रस्तावित ११ कि.मी. लांबीचे रस्ते तयार करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या रस्त्यांना शहरातील विविध कॉलनी व परिसरातील ५४ रस्ते येऊन मिळणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. तसेच झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगेबाबा यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम हे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून १५ आॅगस्टला त्याचे अनावरण करण्यात येईल; असे त्यांनी सांगितले.
कॉँग्रेसने पोसलेले चोर देश सोडून पळू लागले कार्यक्रमात आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. त्यानंतर ते म्हणाले, की भाजपा केंद्र व राज्यात सत्तेत आल्यामुळेच कॉँग्रेसने पोसलेले चोर पळू लागले आहेत. हे सांगताना त्यांनी विजय मल्ल्या, निरव मोदी यांची उदाहरणे दिली. कॉँग्रेस सरकारच्या काळात झालेली घाण आता आम्हांला साफ करावी लागत असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले.