रवींद्र राजपूत, मालपूर (धुळे) : जिल्ह्यात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बकऱ्यांचा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवारी मालपूर (ता.शिंदखेडा) येथे मेंढपाळांनी वाद्याच्या गजरात बकरी पोळा साजरा केला.
सकाळी आठ वाजता सागर सिनेमा परिसरातुन बकरी पोळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. अमरावती मध्यम प्रकल्प रस्त्यावरुन इंदिरानगर, पातालेश्वर महादेव मंदिर, मोठे महादेव मंदिर, महाराणा प्रताप चौक, अहिल्याबाई होळकर चौक, भगवा मारोती चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, भवानी नगर या मार्गावरून मिरवणुकीचा सुराय रोड चौफुलीवर समारोप करण्यात आला. दरम्यान गावातील सर्वच महापुरुषांच्या स्मारकांवर श्रीफळ वाढवुन शेळ्यामेंढ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी मेंढपाळ साकडे घालत होते. यावेळी काही शेळ्यांनी घोड्या सारखे नृत्य केल्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
बैल पोळा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेळ्यांचा पोळा असतो. या दिवशी बकऱ्यांच्या शिंगांना रंग लावुन त्यावर फुगे बांधुन, संपुर्ण अंगावर विविध रंगांची उधळण करण्यात येते. हा बकरी पोळा पाहण्यासाठीही गर्दी झाली होती.