धुळे : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, या एसटी महामंडळाच्या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खातेदारांशी मोबाइलवर किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरम् बोला, असे आदेश देण्यात आले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी जळगाव, धुळे, नंदुरबारसह राज्यभरातील व्यवस्थापकांना दिले आहेत.
एसटी बँकेवर ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलने गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविली होती. या नूतन संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांमध्ये देश प्रेमाविषयी जागृता व्हावी, म्हणून हा निर्णय घेतला असल्याचा सूर कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या बँकेच्या शाखा असून, प्रत्येक जिल्ह्यात एसटीचे चालक-वाहक मोठ्या संख्येने बँकेचे खातेदार आहेत. या बँकेत आतापर्यंत फोन केल्यावर बँकेत काम करणारे कर्मचारी हॅलो म्हणायचे. मात्र, आता त्यांना हॅलो ऐवजी, वंदे मातरम् बोलून फोनवर पुढील कामकाजाविषयी बोलण्याची सूचना केली आहे. तसेच या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही म्हटले आहे.
बँकेतर्फे एटीएम कार्डचे वाटप, मात्र पैसे काढण्यासाठी एटीएमच नाही..
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी शाखा असून, एसटीच्या चालक-वाहक व इतर बहुतांश कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून होतात. पगारानंतर कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी बँकेतर्फे खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, खान्देशसह राज्यभरात या बँकेचे कुठेही एटीएम नाही. त्यामुळे पगारानंतर एसटी कर्मचाऱ्यांना इतर बँकेच्या एटीएमवरून पैसे काढावे लागत आहेत. इतर बँकेच्या एटीएमवरून पैसे काढावे लागत असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांचे बँकेच्या नियमाप्रमाणे शुल्कही कापले जात आहे. त्यामुळे बँकेचे नवीन संचालक मंडळ वंदे मातरम् बोलण्याचा निर्णय घेण्याबरोबरच, एटीएमची सेवा सुरू करण्याचा निर्णय कधी घेणार, असा सूर बँकेच्या खातेदारांमधून उपस्थित केला जात आहे.
वंदे मातरम्’ म्हटल्यावर आपल्या मनात मातृभूमीबद्दल प्रेम निर्माण होते, अभिमान वाटतो. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी खातेदारांशी बोलताना हॅलोऐवजी यापुढे वंदे मातरम् बोलण्याबाबत संचालक मंडळाने निर्णय घेऊन तशा सूचना केल्या आहेत. तसेच बँकेचे एटीएम सुरू करण्याचा लवकरच निर्णय घेण्यात येईल. या बँकेतील खातेदारांच्या हिताचे जे-जे निर्णय घेणे शक्य आहे, ते आम्ही घेऊ.-ॲड. गुणरत्न सदावर्ते, संस्थापक अध्यक्ष, एसटी कष्टकरी जनसंघ.