शिंदखेडा (धुळे) : कृषी विभागाच्या पथकाने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथील घरातून बुधवारी जप्त केला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात विक्रेत्यासह उत्पादन कंपनीचे मालक व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारीही धुळ्यात ६ लाखांचा एचटीबीसी बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. भरारी पथकाने बुधवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील लोहगाव येथील संतकृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक ईश्वर चिंतामण माळी यांच्या घरातून ८ लाख १० हजार रूपये किंमतीचे ६५० प्रतिबंधित एचटीबीटी कापसाचे बियाणे जप्त केलेले आहे.
ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरूण तायडे, शिंदखेडयाचे कृषी अधकारी अभय कोर, कृषी अधिकारी रमेश नेतनराव, यांच्या पथकाने केली. याप्रकरणी अभय कोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वर चिंतामण माळी (४२) याच्यासह बियाणे उत्पादन करणारी कंपनीचे मालक व संचालकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाठ, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.