लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : वस्तू व सेवा कर (जीएसटी) १ जुलैपासून लागू झाल्यामुळे यंदा गणेश मूर्तींच्या किमतीतही १० ते १५ टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती दोंडाईचा शहरातील मूर्ती विक्रेत्यांनी दिली आहे. अवघ्या काही दिवसांवर लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील कारागीर ‘श्रीं’ ची मूर्ती साकारण्यात गर्क दिसत असून गणेश मंडळांचे कार्यकर्तेही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाºया मोठ्या मूर्ती तयार करणारे दोन मूर्तिकार आहेत. शहरात १२ सार्वजनिक मोठी गणेश मंडळे आहेत. गणेशाचे आगमन लवकरच होणार असल्याने शहरातील कारखान्यांमध्ये मूर्तीचे काम करण्यासाठी मूर्तिकार प्रयत्नशील दिसत आहेत. बुकिंगला सुरुवात आकर्षक मूर्ती व कार्यकर्त्यांना हवी असलेली मूर्ती कारागिरांकडून तयार करून घेणाºयांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळे शहरातील मूर्ती विक्रेत्यांकडे आतापासूनच मूर्ती विकत घेण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे. दोंडाईचा शहरासह नंदुरबार, धुळे, मालेगाव, चाळीसगाव व तसेच लगतच्या गुजरात राज्यातूनही गणेश मूर्ती नोंदणीसाठी कार्यकर्ते शहरात येऊ लागली आहेत. कच्चा मालाच्या किमती वाढल्या१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यामुळे गणेश मूर्ती साकारण्यासाठी लागणारे प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंग, माती, नारळाच्या चुट्ट्या व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा गणेश मूर्तींच्याही किमती गेल्या वर्षाच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढणार असून विशेष म्हणजे घरगुती गणपतीच्या मूर्तीपेक्षा मोठ्या गणेश मूर्तींसाठी गणेशभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. बाहुबलीच्या आकारातील गणेश मूर्तीला मागणी यावर्षी बाहुबलीच्या आकारातील गणेश मूर्तीला गणेश भक्तांकडून विशेष मागणी दिसत आहे. त्यादृष्टीने मूर्ती साकारण्याचे काम सुरू असून पाण्यात सहज विरघळणाºया शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यावर भर देत असल्याची माहिती शहरातील विक्रेते राजा पेंटर उर्फ अशोक भावसार यांनी दिली. धुळे शहरातही बाप्पाच्या आगमनाची तयारी धुळे शहरातील इंदिरा गार्डन परिसरात प्रिन्स मित्र मंडळाने ठिकठिकाणी ‘आतुरता आगमनाची’ या शीर्षकाचे फलक लावल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज असल्याचे दिसून येत आहे. धुळे शहरातील मोहाडी उपनगर, साक्री रोड परिसर, बिलाडी व जुन्या धुळ्यातील विक्रेत्यांचे गणेश मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे दिसत आहे. काही गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्तेही आतापासूनच तयारीला लागले असून गणेश मूर्ती बुकिंग करत आहेत.
जीएसटीमुळे महागणार बाप्पाची मूर्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:55 PM