धुळे: शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाजवळ एका वाहनातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १ लाख ५८ हजारांची बीअर व चार लाखांचे वाहन असा एकूण ५ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बोराडी-मालकातर रस्त्यावर करण्यात आली. चालक वाहन सोडून फरार झाला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरपूर विभागाचे निरीक्षक डी.पी. नेहल व दुय्यम निरीक्षक ए.सी. मानकर हे पथकासह मध्यप्रदेश राज्यालगत सीमावर्ती भागात गस्त घालत होते. त्यांना एका चारचाकी (क्र.एमएच ४३-एन७९५) वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली बीअरची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार रविवारी रात्रीच्या वेळी बुडकी शिवारातील मालकातर ते बोराडी रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावला. काही वेळानंतर समोरून संशयित वाहन येताना दिसले. त्यास थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबता भरधाव वेगाने पळून गेला. त्यामुळे पथकाने त्या गाडीचा पाठलाग करून सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग केला. चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात बीअरचे ६० खोके आढळून आले. पथकाने बीअर व वाहन असा एकूण ५ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.