धुळे : निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लोकप्रतिनिधींचा जल्लोष आणि त्यानंतर हाती घेतलेला कारभार असा राजेशाही थाट आपण कायमच पाहतो, मात्र जर त्या लोकप्रतिनिधीने आपल्या कार्यातून इतरांना संदेश दिला तर निश्चितच त्याचा परिणाम हा इतरांवर देखील चांगला होत असतो. असाच आपल्या कार्यातून संदेश देत सरपंच पदाचा पदभार स्वीकारणाऱ्या साक्री तालुक्यातील एका महिला सरपंचाने इतरांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहराजवळील गव्हाणीपाडा- माळपाडा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नुकत्याच विजय झालेल्या लोकनियुक्त सरपंच बालीबाई बाजीराव चौरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी विजयी झाल्यानंतर सरपंच पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये नवीन केरसुणी घेऊन आल्या आणि स्वतः झाडू मारून कार्यालयाची साफ-सफाई करीत आपला सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीमधील भिंतीवरील जाळे व घाण-कचरा काढून ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ करीत एक आगळावेगळा आदर्श गावासमोर ठेवला आहे. नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचांनी केलेल्या या कार्याची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तर ग्रामस्थांनी सरपंचांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. बालीबाई चौरे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ग्रामपंचायतीची साफसफाई केल्यानंतर आता भविष्यात गावाच्या विकासासाठी तसेच गावाच्या स्वच्छतेसाठी त्या नेमक्या कसे प्रयत्न करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.