भिका पाटील
शिंदखेडा (धुळे) : खान्देशातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण लक्षात घेता दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबार मार्गे भुसावळ-सातारा रेल्वे सुरू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिंदखेडा येथे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी दिले. मंत्री रावसाहेब दानवे हे जालन्याहून विशेष रेल्वेने सुरत येथे जात असताना, काहीवेळ शिंदखेडा स्थानकावर थांबले असता, रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात संघटनेने शिंदखेडा -पुणे रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली असता, दानवे यांनी शिंदखेडा-पुणे ऐवजी भुसावळ-सातारा ही रेल्वे गाडी दिवाळीपूर्वी सुरू करणार असल्याचे सांगितले. ही गाडी जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, नंदुरबार, नवापूर भेस्तान मार्गे वसईरोड, कल्याण, कर्जत, लोणवळा, पुणे मार्गे साताऱ्याला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या तापी सेक्शनवर पुण्याला जाण्यासाठी गाडी नसल्याने, प्रवाशांना खासगी अथवा महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा लागतो. मात्र भुसावळ-सातारा रेल्वे सुरू झाल्यास खान्देशातील प्रवाशांची सोय होणार आहे.