आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांनाही महाविकास आघाडीतर्फेही चारही विषय समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या सभापतीपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी ४० तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी १६ मते मिळाली.सभापतीपदी धरती देवरे, मोगराबाई पाडवी, मंगलाबाई पाटील, रामकृष्ण खलाणे, यांची निवड जाहीर होताच भाजप समर्थकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान चार पैकी तीन विषय समितींच्या सभापतीपदावर महिला सदस्यांची निवड झाल्याने, विषय समिती सभापतीपदावर महिलाराज अवतरले आहे.विषय समिती सभापती निवडीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यांना प्रांताधिकारी भीमराज दराडे, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांनी सहकार्य केले.दुपारी ३ वाजता सभापतीनिवडीसाठी सभा सुरू झाली. सुरवातीचे दहा मिनीटे अर्ज माघारीसाठी देण्यात आले. मात्र कोणीही अर्ज माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. यावेळी अपक्ष सदस्यानेही भाजपला सहकार्य केले.यात भाजपच्या सभापतीपदाच्या चारही उमेदवारांना प्रत्येकी ४० तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना १६ मते मिळाली. सभापतीपदी भाजप उमेदवारांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.सभापतीपदी भाजप उमेदवारांची निवड जाहीर होताच भाजप समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण केली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.यावेळी प्रशासनातर्फे नवनिर्वाचित सभापतींचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
धुळे जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतीपदावर भाजपचे उमेदवार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:49 AM