लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीत भाजपने प्रथमच ऐतिहासिक विजय मिळवत स्पष्ट बहूमत मिळवले़ भाजपने आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामसह राष्ट्रवादी-कॉग्रेस आघाडी व शिवसेनेलाही चितपट केले़ दुपारी दिड वाजता पहिला व पावणेचार वाजता अखेरचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केला़ भाजपने प्रथमच महापालिकेत बदल घडवला आहे़ मतमोजणी केंद्रात गर्दीमहापालिका निवडणूकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली़ दिवसभरात ५९़६४ टक्के मतदान झाले होते़ त्यात अखेरच्या दोन तासांत तब्बल २२ टक्के उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ त्यामुळे अखेरच्या दोन तासांत झालेले मतदान निर्णायक ठरणार, हे स्पष्ट झाले होते़ परिणामी, कोणत्या पक्षाला किती यश मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते़ त्यामुळे नगावबारीच्या मतमोजणी केंद्रासमोर सकाळी ८ वाजल्यापासूनच गर्दी व्हायला सुरूवात झाली होती़ विविध पक्षांचे उमेदवार, समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते़ दरम्यान, सोमवारी सकाळी १० वाजता टपाली मतपत्रिकांच्या मोजणीने मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला़ सर्व सहा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया सुरू केली़ तत्पूर्वी प्रभागातील उमेदवार व त्यांचे समर्थक मतमोजणी कक्षात उपस्थित झाले होते़ उमेदवारांचा विजयोत्सवप्रत्येक प्रभागातील मतदान केंद्रांच्या संख्येइतक्या फेºयांनुसार मतमोजणी सुरू होती़ उमेदवारांचे समर्थक प्रत्येक फेरीचे निकाल लिहून घेत होते़ त्यामुळे कितव्या फेरीनंतर कोणता उमेदवार आघाडीवर आहे, याची चर्चा त्याठिकाणी होती़ एकाच प्रभागात प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार देखील एकमेकांना मिळालेल्या मतांची आपुलकीने विचारणा करीत होते़ प्रभाग क्रमांक १७ चे निकाल सर्वप्रथम जाहीर झाल्याचे दिसून आले़ फेºयांनुसार निकाल निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून माईकवरून जाहीर केले जात होते़ दुपारी पावणेचार वाजता अखेरचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला़ परंतु विजयाचे चित्र स्पष्ट होत आल्यानंतर विजयाच्या घोषणेची वाट न पाहता उमेदवारांकडून विजयोत्सव साजरा करण्यास सुरूवात झाली होती़ काही उमेदवारांना विजयामुळे आनंदाश्रू अनावर झाले होते़ अनेक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते़ काही उमेदवारांनी विजयानंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही अलिंगन देत त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या़ पोलीसांचा सौम्य लाठीचार्जविजयी उमेदवार मतमोजणी केंद्रातून बाहेर येताच समर्थकांकडून जल्लोष केला जात होता़ उमेदवारांना खांद्यावर घेऊन हारतुरे देत अभिनंदन केले जात होते़ तर काहींनी ढोलताशांच्या गजरात ठेकाही धरला़ काही उमेदवारांच्या समर्थकांनी उत्साहाच्या भरात मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न करताच पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली़ त्यामुळे एकच पळापळ झाल्याने काहींची दुचाकी वाहने पडल्याचे दिसून आले़ या प्रकारानंतर विजयी उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जाऊन फटाक्यांची आतषबाजी करत विजय रॅली काढल्याचे दिसून आले़ सोशल मीडियावर वर्षावमनपा निवडणूक निकालाची उत्सुकता राज्यभरात लागून असल्याने कोण आघाडीवर व कोण पिछाडीवर याची सोशल मीडियावर चर्चा होती़ मात्र नगावबारी मतमोजणी केंद्रात मोबाईल नेटवर्कला असलेल्या अडचणींमुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला़ त्यामुळे त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला़ मात्र विजयी उमेदवारांचे अभिनंदन सोशल मीडियावर केले जात होते़ शिवाय जल्लोषाचे फोटो, व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले़ मनपा निवडणूकीमुळे शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात होता़
भाजपने घडवला महापालिकेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:11 PM