राजेंद्र शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या धुळे जिल्ह्यात आता काँग्रेस पक्ष काही विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादीत झाल्यासारखी परिस्थिती आहे. याउलट भाजपाने धुळे महापालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिंदखेडा नगरपंचायत काबिज करीत आपले वर्चस्व वाढविले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पाचही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची यादी वाढतच आहे. दुसरीकडे काँग्रेसला आपले वर्चस्व असलेले विधानसभा मतदारसंघातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. तर राष्टÑवादीला जिल्ह्यात यंदा आपले खाते उघडण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.
धुळे शहर मतदारसंघात. शिवसेनेला अद्याप एकदाही विजय मिळविता आलेला नाही. याउलट युती न झाल्याने गेल्यावेळेस पहिल्यांदाच निवडणूक लढवित असलेल्या भाजपाने विजय मिळविला. येथून भाजपातर्फे आमदार अनिल गोटे निवडून आले होते. ते आता भाजपात नाही. यंदा भाजपात येथून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची यादी मोठी आहे. त्यात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवी बेलपाठक, डिजीटल शाळेचे प्रणेते हर्षल विभांडीक, डॉ.माधुरी बाफना ही नावे प्रमुख आहेत.
याउलट काँग्रेसकडे नगरसेवक साबीर शेख आणि ज्येष्ठ नेते उद्योजक किशोर पाटील तर राष्टÑवादीकडून माजी आमदार व जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांचे नाव चर्चेत आहे. आघाडीत ही जागा कोणाला मिळेल. त्यावरच पुढील राजकीय गणित ठरणार आहे.शिवसेनेत नुकतेच परत सक्रीय होणारे सतीश महाले, माजी आमदार प्रा.शरद पाटील आणि डॉ. सुशील महाजन ही तीन नावे चर्चेत आहे. विद्यमान आमदार अनिल गोटे हे लोकसंग्रामतर्फे लढणार की अन्य कुठल्या पक्षातून हा सुद्धा शहरातील चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी राष्टÑवादीचे नेते शरद पवार आणि मनसेचे राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर सन २००९ चा अपवाद वगळता कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ मध्ये येथून काँग्रेसचे कुणाल पाटील हे निवडून आले होते. यंदाही कुणाल पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत कुणाल पाटील हे पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे त्यात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजप उमेदवारापेक्षा कमी मते मिळाली आहेत. राष्टÑवादीशी आघाडी झाली नाहीतर येथून राष्टÑवादीतर्फे माजी जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव पाटील आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष किरण शिंदे हे सुद्धा इच्छुक आहे. भाजपतर्फे येथून माजी जि.प. अध्यक्ष मनोहर भदाणे किंवा त्यांचे चिरंजीव राम भदाणे, प्रा.अरविंद जाधव, माजी जि.प.सदस्य रामकृष्ण खलाणे यांच्या नावाची चर्चा आहे.शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार जयकुमार रावल हे विजयी झाले आहे. भाजपातर्फे त्यांचे नाव निश्चित आहे. शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या नावाची चर्चा आहे. येथून काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, माजी नगराध्यक्षा जुही देशमुख, जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे हे इच्छुक आहेत़ राष्टÑवादीतर्फे संदीप बेडसे, अॅड़ रविंद्र अशोक मोरे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, पं.स.सदस्य सतीश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाºया शिरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार काशिराम पावरा यांचे नाव निश्चित मानले जात आहे. कारण मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते आमदार अमरिशभाई पटेल यांनी त्यांचे नाव आधीच जाहीर केले आहे. भाजपकडून उत्तर महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ़ जितेंद्र ठाकूर, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, खासदार हिना गावीत यांची लहान बहीण सुप्रिया इच्छुक आहेत.
धुळ्याची सूत्रे यंदाही जळगावमधूनच हलणारधुळे महानगरपालिका निवडणुकीपासून जिल्ह्याचे भाजपाचे पालकत्व घेतलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे महापालिकेत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर लोकसभा निवडणुकीतही नंदुरबार व धुळे जिल्ह्यात भाजपाच्या विजयात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा तेच धुळे जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील, हे निश्चित आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्याच्या भाजपाच्या राजकारणाची सुत्रे ही जळगाव येथूनच हालतील, हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.साक्री मतदारसंघात काँग्रेस - भाजपात लढत होणार असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेसला आघाडी मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह दिसून येतो. येथून काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार डी. एस. अहिरे यांच्यासोबतच माजी खासदार बापू चौरे, पंचायत समिती सदस्य गणपत चौरे, संजय ठाकरे यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे.भाजपतर्फे धुळ्याच्या माजी महापौर मंजुळा गावीत, मोहन सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतर्फे हिंमत साबळे यांचे नाव चर्चेत आहे.