सुरेश विसपुते धुळे - महापालिकेच्या निवडणुकीत ७३ पैकी एकहाती ५० जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाकडून सत्ता अक्षरश: हिसकावून घेतली. भाजपच्या या विजयामुळे राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाची सलग १५ वर्षांची सत्ता लयास गेली असून भाजपने अपेक्षित यश प्राप्त करत येथील महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपने निवडणुकीची जबाबदारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांकडे सोपविली होती. पालघर, नाशिक, जामनेर, सांगली व जळगाव येथे त्यांच्या नेतृत्वात पक्षाने मोठे विजय प्राप्त केल्याने येथील निवडणुकीला स्वाभाििवक एक वलय प्राप्त झाले. त्यात या पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने सुरूवातीपासून निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंत्री गिरीष महाजन यांनी निवडणुकीत ‘फिफ्टी प्लस’चा नारा दिला होता. गेल्यावेळी अवघ्या तीन जागांवर या पक्षाला विजय मिळाला होता. त्यामुळे एकदम ५० किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळवू, असे त्यांचे सांगणे अनेकांना बुचकळ्यात टाकणारे ठरले होते. परंतु नियोजनबद्ध प्रयत्नांनी त्यांनी हे यश खेचून आणले, असेच म्हणावे लागेल. पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी या निवडणुकीत पक्षापासून फारकत घेतली. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची पक्षाशी सुंदोपसुंदी सुरू होती. अखेरीस त्यांनी लोकसंग्राम पक्षाच्या नावाखाली वेगळी चूल मांडली. त्यानंतर भाजपने आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रीत केले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल व पक्षाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल मंत्री गिरीष महाजनांसोबत होते. पक्षाने आरोप व विरोधाला फारसे महत्त्व न देता आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी सूक्ष्म नियोजन व व्यवस्थित प्रयत्न केले. शहराचा वर्षानुवर्षे खुंटलेला विकास, मूलभूत सोयीसुविधांची परवड या मुद्यांवर भर देत शहर विकासाचा नारा दिला. शिवाय शहरातील नागरिकांकडून आॅनलाईन सूचना मागवून त्यावर आधारित जाहीरनामा पक्षाने तयार करून प्रकाशित केला. त्यामुळेही नागरिक भारावले. पक्षाच्या यशात त्याचाही मोठा वाटा आहे. येथील नागरिकांच्या मनाला गेल्या अनेक वर्षांपासून प्रशस्त रस्ते, रोज पाणीपुरवठा, भूमिगत गटारी, पथदिव्यांची व्यवस्था, उद्योग व व्यापाराचा विकास अशा अनेक विकासात्मक मूलभूत गोष्टींची आस लागली आहे. त्यालास भाजपने साद घातली. आणि नागरिकांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. त्यामुळे या पक्षाला आजचा हा मोठा विजय साकारता आला. लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान आता भाजपपुढे आहे. त्यासाठी मूलभूत सोयीसुविधांसह हॉकर्स झोन, व्यापार-उद्योगांचा विकास, उद्यानांची निर्मिती अशा अनेक बाबींची वेळेत पूर्तता करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत.
अपेक्षित यश मिळवून भाजपचे महापालिकेवर वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 5:28 PM