धुळे : ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारकडे बाजू मांडली होती. सर्वकाही असताना भाजपाच्या कार्यकाळात आरक्षण मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे अनेकवेळा भाषणातून टीका होते. मात्र, विरोधात बाेलल्यानंतर भाजपाची यंत्रणा इन्कम टॅक्स कारवाई करण्यासाठी सज्ज असते, अशी टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी जि. प सदस्य किरण पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण व भाजपाकडून होणारी ईडीची कारवाई यासंर्दभात बोलताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिले. ज्या ठिकाणी जरी राष्ट्रवादी उमेदवार नसेल त्या ठिकाणी शिवसेना किंवा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकजुटीने लढा द्या, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले.
भाजपाची इन्कम टॅक्स कारवाईसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:39 AM