धुळे : राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, भाकप आणि कामगार संघटना संयुक्त कृती समितीने बुधवारी राष्ट्रीय काळा दिवस पाळून घरांवर काळे झेंडे लावत केंद्र सरकारचा निषेध नाेंदविला.
नवी दिल्ली येथे चारही प्रमुख राष्ट्रीय महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी २६ नाव्हेंबर २०२० पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला बुधवारी सहा महिने पूर्ण झाले; तरीही केंद्र शासनाने कामगार, शेतकरी विरोध कायदे मागे घेतले नाहीत. त्यामुळे घरांवर काळे झेंडे लावून, शहरातील क्युमाईन क्लब येथे काळे झेंडे दाखवत निदर्शने करून राष्ट्रीय काळा दिवस पाळण्यात आला. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार निवडणुका जिंकण्यात व्यस्त असल्याने कोरोनाची महामारी रोखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे व्यवसाय चाैपट झाले, लाखो नागरिकांचे जीव गेले, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. देशावर आपत्ती असताना पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले. शेतकरी संकटात असताना खते, बियाण्यांच्या किमती वाढविल्या. सरकारच्या या शेतकरी, कामगार विरोध धोरणाचा यावेळी निषेध केला. शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी इंटकचे प्रमोद शिसोदे, हमाल मापाडी कामगार संघटनेचे गंगाधर कोळेकर, किसान सभेचे वसंत पाटील, एमएसएमआरएचे प्रशांत वाणी, दीपक सोनवणे, आयटकचे पोपटराव चाैधरी, सिटूचे एल.आर. राव, धुळे-नंदुरबार कामगार संघटनेचे राजेंद्र चाैरे, सिटूचे सेक्रेटरी शरद पाटील, युनायटेड फोरम ऑफ बँक संघटनेचे संजय गिरासे, एस. यू. तायडे, पुरोगामी प्रतिष्ठानचे महेंद्र शिरसाठी आदी उपस्थित होते.