लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एका वाहनातून अवैधरित्या दारुचा साठा वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच साक्री तालुक्यातील व्हेरगाव फाटा येथे निजामपूर पोलिसांनी नाकाबंदी केली़ वाहन येताच त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर वाहन, रोख रक्कम आणि दारुचा २ लाख १२ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे़एमएच १० एएम ९३२५ क्रमांकाची कारमध्ये दारुचा साठा वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांना मिळाली़ माहिती मिळताच साक्री तालुक्यातील व्हेरगाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली़ कार येताच त्या कारची तपासणी करण्यात आली़ त्यात ९ हजार ९८४ रुपयांचा दारुसाठा, ८०० रुपये किंमतीचा मोबाईल, १ हजार ६०० रुपयांची रोकड आणि २ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण २ लाख १२ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ यात नारायण ंअशोक पगारे (माळी) रा़ जैताणे याला ताब्यात घेण्यात आले़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ, कर्मचारी सागर ठाकूर, संदिप गवळी, कमलेशसिंग गिरासे यांनी ही कारवाई केली आहे़ संशयित नारायण पगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला़ दरम्यान, दारुसाठा कुठे जात होता याची चौकशी सुरु आहे़
नाकाबंदी करुन दारुसाठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:42 PM