लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे रविवारी जमावाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी २५ लाख रूपये व एकास शासकीय नोकरी द्या, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान मंगळवेढा परिसरातील काही गावांचे सरपंच व ग्रामस्थ पिंपळनेर येथे दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांनी येथील त्यांच्या वस्तीवरच या मागणीसाठी ठिय्या दिला आहे. रविवारी राईनपाडा येथे घडलेल्या क्रूर घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रात्री उशीरा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांनी शासनाकडे घटनेतील पाचही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपये व कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत येथील वस्तीवरच ठिय्या दिला आहे. सरपंच, ग्रामस्थ दाखल दरम्यान घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवेढा परिसरातील खवे, मानेवाडी व अन्य गावांचे सरपंच व नाथपंथी डवरी समाजाचे ग्रामस्थ येथे येऊन दाखल झाले. समाजातील आणखी काही प्रतिष्ठित व्यक्ती पिंपळनेर येथे दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतरच आम्ही शासनाशी चर्चा करून आपला निर्णय जाहीर करू, असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. पिंंपळनेरकरांकडून मदतीचा हात या घटनेनंतर वस्तीवर चूल पेटली नसून मृतांच्या कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना मदत करण्यासाठी पिंपळनेरकर सरसावले आहेत. तेथील विविध संस्था, संघटना व व्यक्तींकडून त्यांच्या चहापानासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली. इतरही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १२ जणांसह जमावाविरूद्ध खुनाचा गुन्हा; २३ जणांना अटक दरम्यान या क्रूर घटने प्रकरणी खूनाच्या भादंवि ३०२ कलमासह अन्य विविध कलमांन्वये १२ संशयितांसह जमावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या पैकी २३ जणांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पिंपळनेर पोलिसांनी सांगितले. या घटनेतील १२ संशयितांची ओळख पटली असून त्यांची नावे अशी : बाळू मन्याराम भवरे, सुरेश मोतीराम बोरसे, अशोक गोपाल राऊत, महारू वनक्या पवार सर्व रा.राईनपाडा, मोतीराम काशिनाथ साबळे रा.निळीघोटी, ता.साक्री, दीपक रमेश गागुडे रा,सुतारे, ता.साक्री, बाबुलाल महाळचे, संदीप महाळचे, दिलीप गवळे सर्व रा.रनमळी, सुरेश कांबळे रा.काकरपाडा, काळू सोन्या गाीत, सोमा मावच्या काळ्या. यांच्यासह अन्य अनोळखी २० ते २५ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी २३ जणांना अटक केली असून उर्वरीतांना अटकेची प्रक्रिया सुरूच आहे. या सर्वांविरूद्ध पिंपळनेर पोलिसांत गुरनं ७४/२०१८ भादंवि कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३४१, ३४२, ३५३, ३२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.