शिरपूर : तालुक्यातील वाघाडी येथील रासायनिक कारखान्यात बॉयलरच्या स्फोटात १४ कामगार मृत्युमुखी पडले व अनेक गंभीर जखमी झाले. या स्फोटात बोराडी येथील डॉ.बी.आर.आंबेडकर अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थीनी रोशनी हिचे वडील उज्जैनसिंग राजपुत यांचा देखील मृत्यु झाला़ रोशनी ही हुशार व गुणी विद्यार्थिनी असून तिच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे म्हणून अध्यापक विद्यालयाने तिच्या परिवाराला बोराडी शैक्षणिक परिसरातून आर्थिक मदत करण्याचे ठरविले. गेल्या आठवड्यात वाघाडीजवळ केमिकल्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटात १४ जणांचा मृत्यु तर ७२ जण जखमी झाल्याची घटना घडली होती़ या घटनेत बोराडी येथे शिक्षण घेणारी रोशनी हिचा वडीलांचा देखील मृत्यू झाला़ त्यामुळे तिचे शिक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे बोराडी परिसरातील शाळा महाविद्यालयात जाऊन शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले. त्यात मातोश्री बनुमाय कन्या विद्यालय, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, फार्मसी कॉलेज, बी.ए.एम.एस. कॉलेज, डि.एड.कॉलेज बोराडी, ज्यूनियर कॉलेज बोराडी मधील सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी मदत देऊन खारीचा वाटा उचलला. यामध्ये विशेष करून मातोश्री बनुमाय विद्यालयातील मुलींनी आपल्या खाऊसाठी आणलेले पैसेदेखील मदत म्हणून दिले.बी.ए.एम.एस कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवासाठी जमा केलेली वर्गणी तसेच फन फेयरसाठी आणलेले पैसे मदत म्हणून या भावी डॉक्टर्सनी मदत म्हणून दिलेत. एकंदरीत माणूसकीचा गहिवर या छोट्या-छोट्या मुलामुलींच्या ह्रदयातून ओसंडत होता. आजही माणूसकी जिवंत आहे याचे मुर्तीमंत उदाहरण रोशनी राजपूतला केलेल्या आर्थिक मदतीवरून दिसून आले. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे या उक्तीचा प्रत्यय आज बोराडी शैक्षणिक परिसरातून दिसून आला.यावेळी ९ हजार ३० एवढी रक्कम जमा झाली. या तुटपुंज्या रोशनी राजपूतचे कुटुंब श्रीमंत होणार आहे अशातला भाग नाही. पण तिला केलेल्या या आर्थिक मदतीला अनेकांचे हात तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीलेत़ या धीराने ती व तिचे कुटुंब भावनिक दृष्ट्या जास्त श्रीमंत झाले हे नक्की. याप्रसंगी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा वैद्य, प्रा.उदय भलकार, जयसिंग पावरा, अनिल लुंगसे, वैशाली निकम, भुषण पाटील, माधव ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले़
बोराडीच्या विद्यार्थ्यांनी जपली माणुसकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:56 AM