धुळे तालुक्यातील मोहाडी ते पिंप्री रोडवरील गोशाळेच्या पुढे भटू दयाराम देवरे यांच्या चिकूच्या शेताजवळील रस्त्यावर सोमवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास एक कार उभी होती. त्याच्याजवळ थांबून एक जण फोनवर बोलत होता. त्याचवेळेस भरत गोरख सूर्यवंशी (रा. वडजाई, ता. धुळे) व त्याच्यासोबत एक जण असे दोघे दुचाकीने येत होते. या दोघांना एकाने थांबविण्याचा इशारा दिल्याने हे दोघेही थांबले. त्याचवेळेस मराठी भाषेत शिवीगाळ करीत मारून टाकण्याची धमकी देत धक्काबुक्की करू लागला. अशातच कारमध्ये ५ ते ६ जण खाली उतरले. त्यांच्या हातात लाकडी काठी, लोखंडी रॉड होते. त्यांनी भरत सूर्यवंशी व त्याच्या सोबतच्या एकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात त्यांच्या हातापायाला व डोक्याला दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या दोघांचे मोबाइल आणि राेख रक्कम असा २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून घेत एमएच ०६ (पूर्ण नंबर निष्पन्न नाही) या क्रमांकाच्या कारमधून पोबारा केला.
स्वत:ला सावरत त्यांनी दवाखाना गाठला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी मोहाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना आपबिती कथन केल्यानंतर याप्रकरणी दुपारी भरत गोरख सूर्यवंशी यांची फिर्याद नोंदवून घेत २५ ते ३० वयोगटातील अनोळखी ५ ते ६ जणांविरुध्द भादंवि कलम ३९५, ३९७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा करीत आहेत.