धुळे : भारतीय जनता पक्षात नेत्यांची संख्या खूप आहे. आता आपल्याला नेत्यांची आवश्यकता नाही. कॉंग्रेस - राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटात उरलेल्या कार्यकर्त्यांना भाजपात आणा, असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले. सोमवारी दुपारी अग्रवाल भवन येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार काशीराम पावरा, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, भूपेशभाई पटेल, जयश्री अहिरराव आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला भाजप नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सामूहिक सत्कार केला. नारायण पाटील यांनी प्रास्ताविक केले. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सत्ताधारी घरात बसलेले असताना भाजपचे कार्यकर्ते सामान्यांची मदत करत होते. आगामी काळ निवडणुकीचा आहे, राज्यात ४५ पेक्षा जास्त खासदार व २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणायचे आहेत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरघोस निधी : सुभाष भामरे
केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरघोस निधी आणल्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. सुलवाडे - जामफळ योजनेसाठी २३०० कोटी रुपयांचा निधी आणला असून ६० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
पाचही आमदार निवडून आणू : अमरीशभाई पटेल
आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही जागा भाजपच्या निवडून आणू, असा विश्वास आमदार अमरीशभाई पटेल यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिरपूर तालुक्यातून एक लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हाऊसफुलचा बोर्ड लावा :
भाजपमध्ये नेत्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे आता हाऊसफुलचा बोर्ड लावण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य आमदार जयकुमार रावल यांनी केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असल्याने भाजपची लोकप्रियता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
लाभार्थ्यांकडून अभिनंदनाचे पत्र घ्या :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गरीबांच्या उत्थानासाठी अनेक गरीब कल्याण योजना राबवत आहेत. गरीब कल्याण योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहून घ्यावे असे आवाहन बावनकुळे यानी कार्यकर्त्यांना केले.