चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथे १४ एप्रिल १९४४ रोजी ऐतिहासिक खजिना लुट केली होती. या घटनेला १४ तारखेला ७५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने साळवे फाट्यावरील क्रांतीस्मारक येथे वैभव नायकवडी यांनी खजिना लुटीच्या स्मृतींना उजाळा दिला.चिमठाणे परिसरातून खजिना कसा लुटण्याचा प्रयत्न झाला, याची साक्ष आजही जशीच्या तशी आहे. नागनाथ आण्णा नायकवडी, जी.डी. लाड, क्रांतिसिंह नाना पाटील, व्यंकट आण्णा रणधीर, शिवाजीराव पाटील, डॉ.उत्तमराव पाटील यांचा खजिना लुटीत सहभाग होता. स्वातंत्र्य लढयात अनेक क्रांतिकारकांनी आपले जीव गमावले, अशा अनेक घटनांची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. चिमठाणे हद्दीतील या खजिना लुटीच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर क्रांतीस्मारक येथे वैभव नायकवडी यांनी जुन्या काळातील स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, १४ एप्रिल १९४४ रोजी धुळे ते नंदुरबार दरम्यान खजिना लुटीची जागा निश्चित करण्यासाठी डॉ.उतमराव पाटील, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली एक भूमीगत पथकाची निवड करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याकरिता ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले अशा हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महादेव जाधव, शिवाजी पाटील, अजित वाजे, संभाजी थोरात, विक्रम पाटील, चिमठाणे गावाचे सरपंच खंडू भिल, वीरेंद्र गिरासे, साळवेचे माजी सरपंच समाधान बोरसे आदी उपस्थित होते.
क्रांतीस्मारकाजवळ दिला ऐतिहासिक स्मृतींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 9:09 PM