लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : पिंपळनेर- सामोडे येथील उसाच्या शेताला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अडीच एकर मधील ऊस जळून खाक झाला. अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले आहे.सामोडे येथील रावसाहेब आत्माराम भदाणे व नरेंद्र रावसाहेब भदाणे यांच्या मालकीचे असलेले सव्वादोन एकर उसामध्ये शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विजेच्या तारांवर शॉर्टसर्किट होऊन आग लागून सव्वादोन एकर वरील जळाल्याने अंदाजे भदाणे यांचे साडेतीन ते चार लाखाचे नुकसान झाले. शेजारी शेतामध्ये काम करत असलेल्या मजूरांनी सांगितले की, तारांवर पक्षी बसून होते. यावेळी येथे शॉर्टसर्किट झाले. यामुळेच ही आग लागल्याचे सांगितले. शेताला आग लागल्याचे कळाल्यावर ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. यासंदर्भात वीज वितरण विभागालाही कळवण्यात आले. तात्काळ वीज कर्मचारी पोहोचून विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला. ज्यावेळेस उसाच्या शेतात आग लागली त्यावेळेस आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्या होत्या. यावेळी वाºयाचे प्रमाणही जास्त असल्याने आग विझवणे अशक्य होत होते. तरी ग्रामस्थांनी परिसरातून पाणी आणण्याचा प्रयत्न केला पण सव्वादोन एकर वरील ऊस सर्वत्र पसरलेला असल्याने आग विझवणे अशक्य होते. यामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम नागरिकांकडून केले जात होते. यासंदर्भात नरेंद्र भदाणे यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली की सव्वादोन एकर वरील ऊस आज सायंकाळी चार वाजता अचानक शॉर्टसर्किट होऊन जळाल्याची माहिती दिली. यात साडेतीन ते चार लाखाचे नुकसान झाले असून पंचनामा व्हावा व याची नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे.
अडीच एकरातील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:08 PM