विसरवाडी (जि. धुळे) : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात उभ्या असलेल्या ट्रकला एसटी बस धडकल्याने झालेल्या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. बुधवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. जखमींना तातडीने स्थानिक ठिकाणी उपचार करून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवापूर आगाराची नवापूर-पुणे बस (एमएच २० बीएल ३२०१) बुधवारी सकाळी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. दुपारी १२ वाजता विसरवाडी-दहिवेल दरम्यान कोंडाईबारी घाटात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावर उभ्या ट्रकवर आदळली. अपघातात बसची डावीकडील पुढील बाजू पूर्णपणे दाबली गेली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने लागलीच स्थानिकांनी आणि महामार्ग पोलिस पथकाने धाव घेत बचाव कार्य सुरू केले.
अपघातात बसचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात बसचालक मोबाइलवर बोलत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.