बळसाणे : एस.टी. महामंडळाने साक्री आगारातून बळसाणे गावाकरीता बस सुरु करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून होत होती. अखेर साक्री ते बळसाणे ही बससेवा सुरु झाल्याने बळसाणे गावासह परिसरातील प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना या बसचा फायदा होणार आहे. बळसाणे येथे प्रथम बस आल्यानंतर येथील रहिवाशी व विद्यार्थ्यांनी चालक व वाहकाचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.बळसाणे गावातून ३० ते ४० शालेय विद्यार्थी दुसाने येथे पुढील शिक्षणासाठी जातात त्या ठिकाणाहून परत येण्यासाठी बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे व जैन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबादकडून येणाºया अनेक भाविकांना साक्रीहून येण्यासाठी बसेसचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे दुसाने व बळसाणे गावातून शाळा व महाविद्यालयीन शिक्षणाकरिता साक्री येथे जावे लागते. मात्र, बस नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. दरम्यान, साक्री ते बळसाणे बस सुरु करण्यासाठी युवा सेना शाखाधिकारी वाशीम पठाण, योगेश महाजन, राहुल गिरासे आदींनी पाठपुरावा केला.बळसाणे गावात बस आल्यावर लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे, शिवसेना उपतालुका प्रमुख महावीर जैन, पोलिस पाटील आनंदा हालोरे, हिंमत खांडेकर, रतनसिंग गिरासे, नवल पाटील, युवराज खांडेकर, नाना सिसोदे, सुरज दाभाडे यांच्यासह ग्रामस्थांनी चालक व वाहक यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
साक्री आगारातून बळसाणे गावाकरीता बस सेवा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:49 AM