धुळे : पदाचा दुरुपयोग करून मुलाच्या नावे रस्ता दुरुस्तीची निविदा मंजूर करून घेतल्याच्या कारणावरून चिमठाणे (ता. शिंदखेडा) गटाचे भाजपचे जि.प. सदस्य वीरेंद्रसिंह इंद्रसिंह गिरासे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. हायकोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याचा निकाल न्यायाधीश कौल यांनी सोमवारी दिला.महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या अधिनियम कलम ११६ (आय) नुसार कोणत्याही जि.प. सदस्याला जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. तसे केल्यास तो अपात्र ठरविला जातो.
असे असतानाही गिरासे यांनी पदाचा गैरवापर करून मुलास आरावे फाटा ते आरावे गावापर्यंत रस्त्याचे कंत्राट मिळवून दिले. याविरोधात चिमठाणे येथील डॉ. भरत राजपूत यांनी सुरुवातीला नाशिक येथील अप्पर आयुक्तांच्या न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होत अप्पर आयुक्तांनी गिरासे यांना अपात्र ठरविल्याचा निकाल नोव्हेंबर २०२१ मध्ये दिला होता. या निकालाला गिरासे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून अप्पर आयुक्तांचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवण्याचा निकाल दिला.
त्यावर गिरासे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने, न्यायालयाने त्याला तूर्त स्थगिती दिली होती. त्यानंतर यावर मार्चमध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने वीरेंद्रसिंग गिरासे यांना अपात्र ठरविण्याचा हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे गिरासे हे जि.प. सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. दरम्यान, या निकालामुळे जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ ३२ झाले आहे.